वेणा नदीवरील पूल अजूनही अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:11 AM2021-08-15T04:11:33+5:302021-08-15T04:11:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गुमगाव : येथील वेणा नदीवरील जुना पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. परंतु ३० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गुमगाव : येथील वेणा नदीवरील जुना पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. परंतु ३० महिन्यांचा दीर्घ कालावधी उलटूनही पुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. बुटीबोरी व हिंगणा औद्याेगिक क्षेत्र तसेच नागपूर, वर्धा येथे जाण्यासाठी महत्त्वाच्या मार्गावरील हा पूल थंडबस्त्यात असल्याने ६ ते ७ किमीचा फेरा मारावा लागत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या पुलाचे बांधकाम कधी पूर्ण हाेणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
गुमगाव येथील वेणा नदीवरील पूल माेडकळीस आल्याने २१ डिसेंबर २०१८ राेजी नवीन पुलाचे भूमिपूजन करून बांधकाम सुरू झाले. अतिशय संथगतीने सुरू असलेलेे बांधकाम ३० महिने उलटूनही अर्धवट आहे. पुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले नसल्याने नागरिक वैतागले आहेत. यासंदर्भात नागरिकांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी व निवेदने तसेच प्रत्यक्ष भेटी दिल्या. मात्र अद्यापही कुणीही दखल घेतली नाही. परिणामी, बुटीबोरी व हिंगणा औद्योगिक परिसर, नागपूर, वर्धा, वागधरा, धानोली, वडगाव येथे जाण्यासाठी नागरिकांना बाह्यवळणमार्गे किंवा धानोली वा कोतेवाडामार्गे ६ ते ७ किमी अधिकचा फेरा फेरा मारून जावे लागत आहे. यात वेळ व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
....
पुलाच्या अपूर्ण बांधकामामुळे नागरिकांना कमालीचा त्रास हाेत आहे. शिवाय, ये-जा करणाऱ्यांना वेळ व आर्थिक भुर्दंड साेसावा लागताे. त्यामुळे लाेकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष पुरवून नागरिकांची गैरसाेय दूर करावी.
- उषा सुखदेव बावणे, सरपंच, गुमगाव.