पुलावरील रविवार बाजार रोखला
By admin | Published: July 25, 2016 02:41 AM2016-07-25T02:41:02+5:302016-07-25T02:41:02+5:30
दर रविवारी दही बाजार व मेहंदीबाग उड्डाण पुलावरील रस्त्यावर लागणारा बाजार यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लागू दिला नाही.
मनपाची कारवाई : मेहंदीबाग उड्डाण पूल व रोड डिव्हायडरवर बसण्यास विक्रेत्यांना रोखले
नागपूर : दर रविवारी दही बाजार व मेहंदीबाग उड्डाण पुलावरील रस्त्यावर लागणारा बाजार यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लागू दिला नाही. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत पोलिसांच्या मदतीने दुकानदारांना बाजार लावण्यापासून रोखले.
सकाळी ७.३० च्या सुमारास बाजार विभाग, अतिक्रमण विभाग व सतरंजीपुरा झोनचे पथक पुलावर तैनात करण्यात आले. महापालिकेतर्फे पुलावरील विजेच्या खांबावर उच्च न्यायालयाच्या निर्देशाची प्रत चिपकविण्यात आली.
यानंतर महापालिकेचे कर्मचारी न्यायालयाचे निर्देश लिहिलेले बॅनर घेऊन विक्रेत्यांना पुल व रस्ता सोडून दुकाने लावण्याचा इशारा देत होते. काही कर्मचारी लाऊडस्पीकरवरून दुकानदारांना तशा सूचना देत होते. दरम्यान, लकडगंज, शांतिनगर, पाचपावली ठाण्यातील पोलिसांचे पथक जागोजागी तैनात झाले.
मनपा बाजार विभागाचे सहायक अधीक्षक नंदू भोवते यांच्यानुसार उच्च न्यायालयात जनहित याचिका क्रमांक ४ दाखल करून पुलावर रस्त्याच्या मध्ये रविवारी बाजार लावला जात असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. यावर न्यायालयाने महापालिकेचा संबंधित विभाग व पोलीस यांची संयुक्त बैठक घेऊन पुलावर वाहतुकीची कोंडी होणार नाही याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिका व पोलिसांनी ही कारवाई केली. दुकानदारांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी पुलाखाली जागा देण्यात आली आहे. त्यामुळे दुकानदारांनी त्या जागेवर आपली दुकाने लावावी, असे आवाहन करण्यात आले.
महापालिका व पोलिसांनी आज केलेल्या कारवाईमुळे सकाळी ते रात्री ७ पर्यंत पुलावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. रात्रीपर्यंत महापालिका व पोलिसांचे पथक गस्त घालत होते. (प्रतिनिधी)