होमिओपॅथीला उज्ज्वल भविष्य
By Admin | Published: February 29, 2016 03:16 AM2016-02-29T03:16:39+5:302016-02-29T03:16:39+5:30
होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांनी सांगितल्याप्रमाणे होमिओपॅथीचा उपचार केल्यास चांगले निकाल मिळू शकतात.
प्रेडेक्टीव्ह होमिओपॅथी परिषद : भाऊसाहेब झिटे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
नागपूर : होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांनी सांगितल्याप्रमाणे होमिओपॅथीचा उपचार केल्यास चांगले निकाल मिळू शकतात. मोठ्या संख्येत रुग्णांना बरे करता येऊ शकते. होमिओपॅथीला उज्ज्वल भविष्य आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल विजयकर यांनी येथे केले.
वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित एक दिवसीय प्रेडेक्टीव्ह होमिओपॅथी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य वक्ता म्हणून ते बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. विलास डांगरे, दाभा येथील आंतरभारती होमिओपॅथी कॉलेजचे संचालक डॉ. भाऊसाहेब झिटे व वक्ता म्हणून डॉ. प्रफुल्ल बोरकर उपस्थित होते. परिषदेत डॉ. विजयकर यांनी मतिमंद, मस्तिष्क पक्षाघात, गतिमंद, अंधत्व, मूकबधिर, जन्मत:च असलेले अपंगत्व होमिओपॅथीने कसे दूर केले जाऊ शकते हे दृकश्राव्याच्या मदतीने सांगितले. परिषदेला देशभरातून ८०० वर होमिओपॅथी डॉक्टर सहभागी झाले होते. कार्यक्रमात डॉ. भाऊसाहेब झिटे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. परिषदेला डॉ. किशोर नरड, डॉ. पल्लवी नरड, डॉ. रुची जैन आदी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)