आश्रम शाळातील विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासासाठी ब्राईटर माइंडचे प्रशिक्षण
By आनंद डेकाटे | Updated: May 4, 2024 18:56 IST2024-05-04T18:54:18+5:302024-05-04T18:56:28+5:30
रविंद्र ठाकरे : आश्रम शाळातील ९० विद्यार्थ्यांचा सहभाग

Brighter Mind Training to Ashram School Students
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आश्रम शाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमासोबत बौध्दिक विकासाला चालना देण्यासाठी हार्टफुलनेस फाउंडेशनच्यावतीने ब्राईटर माइंडचे प्रशिक्षण ९० विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले आहे. विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासाला चालना देणारा हा उपक्रम आदिवासी विकास विभागाच्या सर्वच शाळांमध्ये प्राधान्याने राबविण्यात येईल असे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी केले.
गिरीपेठ येथील आदिवासी विकास भवन येथे आश्रम शाळातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ब्राईटर माइंड प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते. हार्टफुलनेस फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक श्रीकांत अन्नापूर्व हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या सहआयुक्त बबीता गिरी, माहिती विभागाचे माध्यम समन्वयक अधिकारी अनिल गडेकर, उपायुक्त दशरथ कुळमेथे, हार्टफुल फाउंडेशनच्या प्रशिक्षण प्रमुख नवीन टांक, संजय शर्मा, मनोज जयस्वाल, गिरीराज उईके, कमु मेश्राम, डॉ. मुकुंदराव देशमुख उपस्थित होते.
ब्राईटर माइंड प्रशिक्षणा अंतर्गत १५ वर्षापर्यंतच्या ९० विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना डोळ्यावर पट्टी बांधून शब्द व चित्रांची ओळख, वाचन, विविध प्रकारचे खेळ, वाचन क्षमता वाढविणे आदी उपक्रम राबविण्यात आले. प्रशिक्षणामध्ये ४९ विद्यार्थ्याने पूर्ण क्षमता यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे इतरही विद्यार्थ्यांच्या क्षमता वृध्दीसाठी हा उपक्रम नियमित राबविण्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा समन्वयक श्रीकांत अन्नापूर्व व प्रशिक्षण प्रमुख नवीन टांक यांनी प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली. दोन्ही डोळ्यावर पट्टी बांधून चित्र, रंग तसेच अक्षर ओळख त्यासाबत वाचन व चित्रकला आदी उपक्रमांचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.