शिक्षणातील दुरवस्था कुलपतींच्या निदर्शनास आणून द्या
By admin | Published: December 24, 2015 03:35 AM2015-12-24T03:35:38+5:302015-12-24T03:35:38+5:30
शिक्षण क्षेत्रातील दुरवस्था कुलपती कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संबंधित याचिकाकर्त्याला दिले.
हायकोर्टाचे निर्देश : परिणामकारक कारवाई करण्याची विनंती
नागपूर : शिक्षण क्षेत्रातील दुरवस्था कुलपती कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संबंधित याचिकाकर्त्याला दिले. तसेच, कुलपती कार्यालयाने याप्रकरणाची पडताळणी केल्यानंतर लवकरात लवकर परिणामकारक कारवाई करावी, अशी विनंती केली.
सुनील मिश्रा यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विविध गैरप्रकारासंदर्भात दोन रिट याचिका दाखल केल्या होत्या. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांनी या याचिका निकाली काढून विविध निर्देश दिलेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, मिश्रा यांना येत्या दोन महिन्यांत कुलपती कार्यालयाला निवेदन सादर करून गैरप्रकाराची माहिती द्यायची आहे. यानंतर कुलपती कार्यालयाने आरोपांची पडताळणी करून तातडीने परिणामकारक कारवाई करायची आहे. नागपूर विद्यापीठाने मिश्रा यांना आवश्यक माहिती द्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, कुलपती कार्यालयातर्फे संबंधित संस्थांना शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा आग्रह करण्यात येईल, अशी खात्रीही न्यायालयाने व्यक्त केली आहे. माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ व डॉ. राजीव सपकाळ यांनी अनेक महाविद्यालयांना मान्यता नसलेले अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची परवानगी दिली व त्यातून कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्तीचा अपहार केला. यामुळे त्यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविण्यात यावी. मान्यता नसलेले अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता काढून घेण्यात यावी. परीक्षा नियंत्रकांनी मान्यता नसलेले अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ नये. आवश्यक शिक्षकांची नियुक्ती केल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मान्यता देण्यात येऊ नये. पूर्णवेळ शिक्षक नाहीत अशा महाविद्यालयांतील अभियांत्रिकी, औषधीशास्त्र, व्यवस्थापन व शिक्षण अभ्यासक्रमाची मान्यता काढून घेण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते.