बँकिंग योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा: डॉ. भागवत कराड
By मोरेश्वर मानापुरे | Published: October 11, 2023 08:40 PM2023-10-11T20:40:30+5:302023-10-11T20:40:54+5:30
अग्रणी बँक व्यवस्थापकांची समीक्षा बैठक.
मोरेश्वर मानापुरे, नागपूर: देशातील सर्व बँका उत्तम कार्य करीत आहे. भारत जगात वेगाने वाढणारी पाचवी अर्थव्यवस्था आहे. बँकिंग हा सर्वांचा अधिकार असून सर्व बँकांनी बँकिंग योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी येथे केले.
नागपूर दौऱ्यात त्यांनी हॉटेल ली मेरीडियिनमध्ये विदर्भ क्षेत्रातील बँकांमध्ये झालेल्या वित्तीय समावेशन संदर्भात समीक्षा बैठक घेतली. त्यांनी बँकांचे वरिष्ठ अधिकारी आणि विदर्भातील अग्रणी बँक व्यवस्थापकांना मार्गदर्शन केले.
बैठकीत खा. सुनील मेंढे, बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक जय नारायन, एसएलबीसीचे उपमहाव्यवस्थापक राजेश देशमुख, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक जोशी पुथोर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे उपमहाव्यवस्थापक स्वाती शर्मा, बँक ऑफ इंडियाच्या विदर्भ क्षेत्राचे व्यवस्थापक रमेश कुमार आणि विदर्भ क्षेत्रातील सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाची माहिती राजेश देशमुख यांनी दिली.
भागवत कराड म्हणाले, बँकांच्या प्रमुखांनी पंतप्रधान जनधन योजना, जीवन ज्योती योजना, सुरक्षा बीमा योजना, स्वनिधी योजना, मुद्रा योजना, सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान निधी योजना, मुद्रा ऋण योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांना फायदा घेण्याचे आवाहन करावे. सर्व राष्ट्रीयकृत, खाजगी, सहकारी, ग्रामीण बँकांनी मिळून भारत सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचव्यात. स्वाती शर्मा यांनी योजनांवर अधिकाधिक जागरूकता आणण्याचे आवाहन केले. राजेश देशमुख यांनी जनतेला बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी नाबार्डच्या विविध योजनांची माहिती दिली. रमेश कुमार यांनी आभार मानले.