पासपोर्ट ऑफिसला येताना सॅनिटायझर सोबत आणा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:28 AM2020-11-22T09:28:06+5:302020-11-22T09:28:06+5:30

नागपूर : कोरोना महामारीच्या काळात मास्क आणि सॅनिटायझर या दोन वस्तू सर्वात महत्त्वाच्या झाल्या आहेत. या काळात सुरू झालेल्या ...

Bring sanitizer with you to the passport office () | पासपोर्ट ऑफिसला येताना सॅनिटायझर सोबत आणा ()

पासपोर्ट ऑफिसला येताना सॅनिटायझर सोबत आणा ()

Next

नागपूर : कोरोना महामारीच्या काळात मास्क आणि सॅनिटायझर या दोन वस्तू सर्वात महत्त्वाच्या झाल्या आहेत. या काळात सुरू झालेल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना सॅनिटायझर लावूनच आतमध्ये प्रवेश दिला जातो. त्यासाठी सर्व कार्यालयातील गेटवरच तशी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पासपोर्ट (पारपत्र) कार्यालयासाठी हे सॅनिटायझरही महागडे वाटत असेल. विभागातर्फे डाॅक्युमेंट व्हेरीफिकेशनचे कंत्राट असलेल्या टाटा कंसल्टीजच्या कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांनाच सॅनिटायझरची व्यवस्था करावी लागते. जवळ नसेल तर वेळेवर दुकानातून घ्यायला सांगितले जाते. लोकमतच्या टीमने कार्यालयाची पडताळणी केली असता ही परिस्थिती समोर आली आहे.

पारपत्रासाठी कागदपत्रांच्या पडताळणीचे आणि माहितीचे काम टाटा कंसल्टीज या कंपनीला सोपविण्यात आले आहे. मानकापूरच्या पुरातन शिवमंदिर भागात या विभागाचे कार्यालय आहे. या ठिकाणी परदेशी प्रवासाच्या परवानगीसाठी दररोज शंभरावर नागरिकांची ये-जा चाललेली असते. गेटवर गार्डद्वारे त्यांचे तापमान मोजण्याची व्यवस्थाही केली आहे. मात्र सॅनिटायझरसाठी त्यांना वेळेवर धावपळ करावी लागते. याबाबत काही नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनंतर लोकमतने शहानिशा केली. गेटवर तैनात असलेले गार्ड भेटीबाबत सूचना असल्याचे तपासतात आणि सॅनिटायझर असण्याची चौकशी करतात. काही लोकांकडे ते असते पण काहींकडे ते नसते किंवा त्यांच्या वाहनात ठेवलेले असते. ज्यांच्याकडे नाही त्यांना वेळेवर दुकानातून घेण्यास सांगितले जाते. कार्यालय परिसरात व बाहेर दुकानात सॅनिटायझर ठेवलेले आहे. तेथून ५० रुपयाची बॉटल खरेदी करून तो हातावर चोळल्यानंतरच नागरिकांना प्रवेश दिला जातो. आवश्यक असलेल्या सॅनिटायझरबाबत असा बेजबाबदारपणा का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

प्रसंग १ : एक मुलगा मित्रासोबत आला. त्याच्याजवळ सॅनिटायझर नव्हते. त्याला वेळेवर दुकानात ५० रुपयाची बॉटल खरेदी करावी लागली व नंतरच एकाला प्रवेश मिळाला.

प्रसंग २ : एका महिलेला तिच्या पर्समध्ये सॅनिटायझर सापडले नाही. त्यांना वेळेवर कार्यालयाबाहेर येऊन सॅनिटायझर घ्यावे लागले.

प्रसंग ३ : एक व्यक्ती व त्याचा तरुण मुलगा ऑफिसमध्ये आले. ते गाडीत सॅनिटायझर विसरले होते. भेटीची वेळ ठरली असल्याने मुलगा धावतच गाडीजवळ गेला आणि सॅनिटायझर आणून हातावर चोळल्यानंतर त्याला प्रवेश मिळाला.

चौकशी कक्षात लपवून ठेवले सॅनिटायझर

कार्यालयात सॅनिटायझर आहे पण ते गेटवर महिलांसाठी असलेल्या तपासणी कक्षात ठेवलेले दिसले. कदाचित कार्यालयाकडून गेटवर ठेवण्यासाठी दिलेले असेल पण गार्डद्वारे ते वेगळे ठेवलेले हाेते. त्याचा उपयोग गार्ड किंवा कार्यालयातील कर्मचारी करीत असल्याचे दिसले.

दुकानदारांशी समेट तर नाही ना?

येणाऱ्या नागरिकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था ठेवणे गरजेचे असताना असे का केले जाते, हा प्रश्न पडतो. येथील सुरक्षा रक्षकांचे सॅनिटायझरच्या दुकानदारांशी साटेलोटे तर नाही ना, असा प्रश्नही विचारला जात आहे.

Web Title: Bring sanitizer with you to the passport office ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.