ब्रिटिशकालीन विहिरींनी १४० वर्षे भागविली छावणीची तहान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 01:10 PM2021-08-02T13:10:08+5:302021-08-02T13:12:19+5:30

Nagpur News भारतातील साम्राज्य विस्तारासाठी १८२१ मध्ये ब्रिटिशांनी सैनिकी कॅम्प उभारला. . या परिसरात बांधण्यात आलेल्या विहिरींच्या बळावर तब्बल १४० वर्षे (१९६१ पर्यंत) छावणीची तहान भागविण्यात आली.

British-era wells quench camp thirst for 140 years! | ब्रिटिशकालीन विहिरींनी १४० वर्षे भागविली छावणीची तहान !

ब्रिटिशकालीन विहिरींनी १४० वर्षे भागविली छावणीची तहान !

Next
ठळक मुद्दे ब्रिटिशांचे जलव्यवस्थापन अन् कन्हान नदी उंट आणि घोडदळासाठी होत्या स्वतंत्र विहिरीमोटेद्वारे केले जायचे जलव्यवस्थापन

 

जितेंद्र ढवळे/सुदाम राखडे 

लोकमत न्यूज नेटवर्क   

नागपूर : ज्या कन्हान नदीच्या बळावर ऐकेकाळी नागपूरकरांची तहान भागविली जायची त्या नदी काठावर मध्य भारतातील साम्राज्य विस्तारासाठी १८२१ मध्ये ब्रिटिशांनी सैनिकी कॅम्प उभारला. ही छावणी यंदा स्थापनेची २०० वर्षे पूर्ण करीत आहे. नदीकाठावर कॅम्प उभारण्यामागे जलव्यवस्थापन हाही एक दृष्टिकोन ब्रिटिशांचा होता. या परिसरात बांधण्यात आलेल्या विहिरींच्या बळावर तब्बल १४० वर्षे (१९६१ पर्यंत) छावणीची तहान भागविण्यात आली.

कामठीच्या पहिल्या तुकडीमध्ये पायदळ, घोडदळासोबतच उंटांचेही दल होते. ही तुकडी ‘काली पलटण’ म्हणून ओळखली जायची. ब्रिटिशांनी येरखेडा, देसाडा, वाघोली, आजनी, वारेगाव परिसर मिळून पूर्ण क्षमतेचे कॅन्टोन्मेंट विकसित केले. ब्रिटिश सैन्याधिकारी, रेजिमेंट कायमस्वरूपी वास्तव्यास आल्या. या परिसरात यासुंबा, टेकरी, सुराह, गादा, सुरादेव आणि कुराडी अशी सहा कॅम्पिंग मैदाने आहेत. ज्यांना ‘सॅनिटरी कॅम्प’ म्हणतात. या परिसरातील जुन्या विहिरी आजही ब्रिटिश वास्तूकला आणि जलव्यवस्थापनाचा पुरावा सांगतात. यातील काही विहिरी आता बुजल्या आहेत.

छावणी उभारल्यानंतर सैनिकांच्या पाण्याच्या सोयीसाठी ब्रिटिशांनी विट, चुन्याच्या मदतीने येथे विहिरी बांधल्या. यातील काही आजही अस्तित्वात आहेत. छावणी परिसरात सैनिकासोबत उंट, घोड्यांच्या वास्तव्याकरिताही सोय करण्यात आली होती. आजचा उंटखाना याची साक्ष देतो. उंटखाना परिसरात सैनिक उंटावरून सवारी करीत देखरेख करीत होते. उंटखाना परिसरात विशाल वडाच्या झाडाखाली एक मोठी विहिरी आहे. या विहिरीतून मोटेद्वारे पाणी टाक्यांमध्ये आणले जायचे. उंट, घोड्यांना पाणी पिणे सोयीचे होईल अशा पद्धतीने टाक्या बांधण्यात आल्या होत्या.

मालरोडवर ब्रिटिश अधिकाऱ्यांचे वास्तव्य होते. त्यामुळे प्रत्येक बंगला परिसरात पाण्याकरिता विहिरी खोदण्यात आल्या होत्या. १९६२ पर्यंत छावणी परिसरात विहिरीतील पाण्याचा उपयोग करण्यात येत होता. १९६१ मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने कन्हान नदीवर पाणीपुरवठा योजना उभारून छावणी परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. यानंतर या विहिरीकडे दुर्लक्ष झाले. धोका होऊ नये म्हणून यातील काही बुजविण्यातही आल्या आहेत. सुरुवातीला कॅन्टोन्मेंटचे (छावणी) क्षेत्रफळ २०६५.२६२ हेक्टर होते. १९२७ साली कामठी नगरपालिकास्थापन झाल्यानंतर छावणीचे क्षेत्र घटले. ते ५६७.३७ हेक्टरवर आले. बागडुरा नाला हा कामठी कॅन्टोन्मेंटला कामठी शहरापासून वेगळा करतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खासगी मालकीचे बंगले आहेत.

आदर्श छावणी

कामठी म्हटलं आज अनेक लोक नाक मुरडतात ! मात्र ब्रिटिशांच्या काळात स्वच्छतेच्या बाबतीत ही छावणी आदर्श होती. १८५८ पासून येथे स्टॉफ अधिकारी असलेल्या जनरल बर्टनने त्याच्या १८८८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘अ‍ॅन इंडियन ऑलिओ’ या पुस्तकात कामठीची छावणी इतर सैन्य छावण्यांपेक्षा नियमित व सुव्यवस्थित देखावा सादर करते, असा उल्लेख केला आहे.

इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारा मालरोड

कन्हान नदीच्या प्रवाहाला समांतर जाणारा मालरोड हा कामठी कॅन्टोन्मेंटमधील महत्त्वाचा मार्ग ४.३ किलोमीटर लांबीचा असून, त्याच्या दोन्ही बाजूंना ब्रिटिशकालीन बंगल्यांचा दर्शनी भाग पाहावयास मिळतो. हा रस्ता रेल्वेस्थानकाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आहे. दुतर्फा वृक्षांमुळे याचे सौंदर्य आजही अबाधित आहे. मॉलरोडवर ब्रिटिश सैन्यदलातील सैनिकांच्या मुलांसाठी १९ एप्रिल १८४८ मध्ये कॉन्व्हेंट सुरू करण्यात आले होते.

असे आहेत नागरी क्षेत्र

कॅन्टोन्मेंटमध्ये वायव्येकडील नवीन गोडाऊन क्षेत्र, मध्यभागी गोरा बाजार आणि दक्षिणपूर्व भागात कॅव्हेलरी बाजार, असे तीन नागरी क्षेत्र आहेत. येथे काही जुनी घरे आहेत. त्यांचे अस्तित्व नावापुरते आहे. सदर बाजार (गोरा बाजार) आता कामठी नगरपालिकेमध्ये परिवर्तीत झाले आहे. नगरपालिका व छावणीचे विभाजन करणारा बागडोर नाला कामठी नगरपालिकेची पूर्व, पश्चिम आणि उत्तर सीमा निर्धारित करतो.

Web Title: British-era wells quench camp thirst for 140 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास