ब्रिटिश उच्चायुक्त अलेक्स एलिस यांची संघस्थानी भेट; मिहानची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 08:40 PM2022-02-08T20:40:11+5:302022-02-08T20:40:37+5:30

Nagpur News ब्रिटिश दूतावासाचे भारतातील उच्चायुक्त ॲलेक्स एलिस यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाची कार्यप्रणाली जाणून घेतली.

British High Commissioner Alex Ellis visits the RSS headquarter | ब्रिटिश उच्चायुक्त अलेक्स एलिस यांची संघस्थानी भेट; मिहानची केली पाहणी

ब्रिटिश उच्चायुक्त अलेक्स एलिस यांची संघस्थानी भेट; मिहानची केली पाहणी

googlenewsNext

नागपूर : ब्रिटिश दूतावासाचे भारतातील उच्चायुक्त ॲलेक्स एलिस यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाची कार्यप्रणाली जाणून घेतली. नागपूर भेटीदरम्यान त्यांनी मिहानचीदेखील पाहणी केली. विविध देशांच्या उच्चायुक्तांनी याअगोदरदेखील संघ मुख्यालयाला भेट दिली आहे.

ॲलेक्स एलिस यांच्या या दौऱ्याबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती. नवी दिल्लीहून नागपुरात आल्यानंतर त्यांनी सकाळी संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या महाल येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत मुंबईस्थित उपउच्चायुक्त (व्यापार-दक्षिण आशिया) ॲलेन गॅम्मेल हेदेखील उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी दीक्षाभूमीलादेखील भेट दिली. दुपारी त्यांनी मिहानचा दौरा केला व महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेन्ट कंपनी तसेच सेझच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली. यावेळी संघ पदाधिकाऱ्यांनी एलिस यांना संघाची कार्यप्रणाली व सेवाकार्यांची माहिती दिली. संघ मुख्यालयात त्यांची नेमकी कुणाशी भेट झाली व चर्चेचा विषय काय होता? याची माहिती प्राप्त होऊ शकली नाही.

याअगोदरदेखील विदेशी उच्चायुक्तांच्या भेटी

मागील काही वर्षांत संघ मुख्यालयात अनेक देशांच्या उच्चायुक्तांनी भेट दिली आहे. सिंगापूरचे तत्कालीन उप उच्चायुक्त जोनाथन टो हे संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सहभागी झाले होते. याशिवाय ब्रिटिश दूतावासाचे कॉन्सेलर किरेन ड्रेक, जर्मनीचे राजदूत वॉल्टर लिंडनर, ऑस्ट्रेलिया दूृतावासाचे उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल्ल, फ्रान्सचे उच्चायुक्त इमॅन्युएल लेनिन यांनीदेखील संघ मुख्यालयाला भेट दिली होती.

‘एमआरओ’चीदेखील पाहणी

ब्रिटिश उच्चायुक्त व त्यांच्या चमूने मिहानमधील सुविधांबाबत जाणून घेतले. तसेच मिहानमधील ‘एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड’च्या ‘एमआरओ’चीदेखील पाहणी केली. त्यांच्या दौऱ्याबाबत तीन तास अगोदरच सूचना मिळाली होती. उच्चायुक्तांनी प्रसारमाध्यमांशी बोलणेदेखील टाळले. शिवाय अधिकृतपणे कुठलीही माहिती जारी करण्यात आली नाही. एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनीदेखील कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. दौऱ्याची गुप्तता व अधिकाऱ्यांचे मौन यावरून विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

Web Title: British High Commissioner Alex Ellis visits the RSS headquarter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.