विज्ञानाच्या प्रत्येक शाखेत रुंदावल्या संशोधनाच्या कक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 11:34 PM2019-03-07T23:34:35+5:302019-03-07T23:35:36+5:30

विज्ञानाची कोणतीच शाखा आज स्वतंत्र राहिली नसून त्यात होणारे संशोधन एकमेकांशी जुळलेले आहे. खगोलशास्त्रात होणारे संशोधन माहिती तंत्रज्ञानाशी, रसायन व भौतिक शास्त्राचे संशोधन सजीव आणि वैद्यकशास्त्रासाठी लाभदायक ठरणारे आहे. अंतराळ, भौतिक, आरोग्य, ऊर्जा अशा प्रत्येक क्षेत्रातील संशोधनाच्या कक्षा रुंदावल्या असून आता कोणतेही संशोधन विशिष्ट विषयापुरते मर्यादित नाही. त्यामुळे विज्ञानाच्या प्रत्येक शाखेत संशोधनासाठी असिमित दालन उभे झाले असून विद्यार्थ्यांनी दिशा ठरवून कार्य केल्यास विज्ञानाच्या क्षेत्रात मोठा बदल घडेल. विविध विषयाच्या तज्ज्ञांनी केलेल्या या आवाहनासह नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचा गुरुवारी समारोप झाला.

The broad range of research in each branch of science | विज्ञानाच्या प्रत्येक शाखेत रुंदावल्या संशोधनाच्या कक्षा

विज्ञानाच्या प्रत्येक शाखेत रुंदावल्या संशोधनाच्या कक्षा

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी दिशा ठरविण्याचे आवाहन : विज्ञान संस्थेच्या राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचा उत्साही समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विज्ञानाची कोणतीच शाखा आज स्वतंत्र राहिली नसून त्यात होणारे संशोधन एकमेकांशी जुळलेले आहे. खगोलशास्त्रात होणारे संशोधन माहिती तंत्रज्ञानाशी, रसायन व भौतिक शास्त्राचे संशोधन सजीव आणि वैद्यकशास्त्रासाठी लाभदायक ठरणारे आहे. अंतराळ, भौतिक, आरोग्य, ऊर्जा अशा प्रत्येक क्षेत्रातील संशोधनाच्या कक्षा रुंदावल्या असून आता कोणतेही संशोधन विशिष्ट विषयापुरते मर्यादित नाही. त्यामुळे विज्ञानाच्या प्रत्येक शाखेत संशोधनासाठी असिमित दालन उभे झाले असून विद्यार्थ्यांनी दिशा ठरवून कार्य केल्यास विज्ञानाच्या क्षेत्रात मोठा बदल घडेल. विविध विषयाच्या तज्ज्ञांनी केलेल्या या आवाहनासह नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचा गुरुवारी समारोप झाला.
‘इमर्जिंग ट्रेन्ड्स इन फंडामेंटल सायन्स’ विषयावरील या दोन दिवसीय या परिषदेत दिवशी पद्मभूषण डॉ. शशिकुमार चित्रे यांच्या मार्गदर्शनासह विविध विषयाच्या तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. गुरुवारी दुसऱ्या दिवशी डॉ. जतिंदर याखमी यांच्या ‘सेल्फ प्रोपेल्ड अ‍ॅक्टीव लिव्हींग मॅटर’ या विषयाला धरून केलेल्या मार्गदर्शनाने सत्राला सुरुवात झाली. याशिवाय राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए.डी. सावंत यांनी ‘प्रदूषण नियंत्रण व क्लायमेट मायग्रेशन’ विषयावर, आयआयटी मुंबईचे माजी अधिष्ठाता डॉ. ए.के. सिंह यांनी ‘इमर्जिंग ट्रेन्ड्स इन केमिकल सायन्सेस’ या विषयावर, डीजीपी (लीगल अ‍ॅन्ड टेक्नीकल) डॉ. हेमंत नगराळे यांनी ‘पोलीस तपासात फॉरेन्सिक सायन्सची उपयोगिता’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. गणितज्ज्ञ डॉ. ए.एस. मुक्तिबोध यांच्या ‘क्रिएटिव्हीटी अ‍ॅन्ड इनोव्हेशन इन मॅथेमॅटिक्स’ या विषयावरील मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरले.
परिषदेत देशभरातील नामांकित संस्थांच्या ४०० विद्यार्थी प्रतिनिधींनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वत: संशोधित केलेले पेपर सादर केले. यामध्ये भौतिकशास्त्र व गणितासह सांख्यिकी शास्त्र, रसायनशास्त्र, मेडिसिन, केमिस्ट्री, क्वॉन्टम मेकॅनिक्स, इन्स्ट्रुमेंटल टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान, वनस्पती व प्राणी हे सजीवशास्त्र, फॉरेन्सिक सायन्स, सोलर एनर्जी आदी विषयातील संशोधनाचा समावेश होता. प्रत्येक विषयाचे पोस्टर प्रेझेंटेशनही विद्यार्थ्यांनी केले होते. यावेळी राजेंद्रसिंह सायन्स एक्सप्लोरेटरीच्यावतीने विज्ञान मॉडेल्सचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. आत्राम, फॉरेन्सिक सायन्सचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे, संयोजक प्रा. सुजाता देव यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परिषद पार पाडली.
कार्बनडाय ऑक्साईडपासून मिथेनॉल
आयआयटी मुंबईचे माजी अधिष्ठाता डॉ. ए.के. सिंह यांनी रसायन विज्ञानातील संशोधन कशाप्रकारे पर्यावरण संवर्धन व सजीवांच्या फायद्याचे ठरू शकते, यावर मार्गदर्शन केले. कार्बनडाय ऑक्साईड हा सजीवांसाठी हानीकारक वायू असून, वर्तमान काळात त्याचे प्रमाण वाढल्याने ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज व प्रदूषणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र या हानीकारक वायूला मिथेनॉलमध्ये परिवर्तित करून उपयोगात आणता येऊ शकते. वैज्ञानिकांचे यावर संशोधन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषिकचरा ज्वलनाने प्रदूषणाची मोठी समस्या पंजाब, हरियाणा व दिल्लीत निर्माण झाली होती. विशिष्ट रसायन तयार करून न जाळता कचऱ्याचे यशस्वीपणे विघटन आणि इतरत्र उपयोग करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. निसर्गात बायोप्रीव्हीलेज मॉलिकुल्स उपलब्ध असून, त्यांचा पर्यावरण संवर्धनासाठी कसा उपयोग करता येईल, यावर प्रचंड संशोधन चालल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फॉरेन्सिक तज्ज्ञ म्हणून मोठ्या संधी : नगराळे
महाराष्ट्र पोलीस विभागाच्या लीगल व टेक्निकल सेलचे डीजीपी डॉ. हेमंत नगराळे यांनी फॉरेन्सिक तज्ज्ञ म्हणून असलेल्या संधीबाबत विद्यार्थ्यांना सांगितले. गुन्हेगारीच्या प्रकारानुसार पोलीस तपासाचा व्यापही वाढला आहे व या प्रत्येक तपासात फॉरेन्सिक तज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची झाली आहे. एनआयए, सीबीआय अशा संस्थांमध्येही फॉरेन्सिक एक्सपर्टचे महत्त्व आहे. आर्थिक आणि सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. या तपास प्रक्रियेत बायोलॉजिकल, डीएनए फिंगर प्रिंट एक्सपर्ट, सायबर एक्सपर्ट अशा अनेक गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात नागपूर, अमरावतीसह सात रिजनल व मुंबईला एक मुख्य फॉरेन्सिक प्रयोगशाळा आहे. चंद्रपूरसह नव्याने पाच उपप्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत, तर ४५ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनही सुरू करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या विभागात मनुष्यबळाचा अभाव असून, ४० टक्के पोस्ट रिक्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी समर्पणाने या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: The broad range of research in each branch of science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.