दलाल पोहोचवित आहेत दुकानांमध्ये ग्राहक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:07 AM2021-05-23T04:07:07+5:302021-05-23T04:07:07+5:30
नागपूर : आता लॉकडाऊनमुळे शटर बंद असलेल्या दुकानांमध्ये दलालांच्या माध्यमातून ग्राहक पोहोचत असल्याची माहिती आहे. याकरिता दलालाला १० टक्के ...
नागपूर : आता लॉकडाऊनमुळे शटर बंद असलेल्या दुकानांमध्ये दलालांच्या माध्यमातून ग्राहक पोहोचत असल्याची माहिती आहे. याकरिता दलालाला १० टक्के कमिशन मिळत आहे. हा प्रकार मुख्यत्त्वे इतवारी आणि गांधीबाग येथील कपड्यांच्या दुकानात सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी इतवारी आणि गांधीबाग भागातील कपड्यांच्या दुकानात मनपाच्या एनडीएस पथकाने धाड टाकून दुकानदाराकडून दंड वसूल केला होता. जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त उर्वरित सर्वच दुकानांना व्यवसाय बंद ठेवण्याचे कठोर निर्बंध आहेत. त्यानंतरही अनेक व्यापाऱ्यांचा व्यवसाय शटरआड सुरूच आहे. आता दुकानात ग्राहक आणण्याची जबाबदारी दलालांवर दिली आहे. दलाल बाजारात बसतात आणि ग्राहक हेरून त्यांना खरेदीसाठी ठरावीक दुकानात नेतात. खरेदी किमतीच्या १० टक्के कमिशन दलालाला मिळते. त्यामुळे काही दिवसात दलालांची संख्या वाढली आहे.
लॉकडाऊनमध्ये व्यापारी आणि दलाल आपापल्या कमाईत जुंपले आहेत. सूत्रांनी सांगितले, इतवारी आणि गांधीबाग येथील कपडा बाजारात जवळपास २५ ते ३० दलाल सक्रिय आहेत. गांधीबाग क्लॉथ मार्केटमधील दलाल रस्त्यावरून जाणाऱ्या ग्राहकांची विचारपूस करून त्यांना दुकानापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत. हा प्रकार चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येते. ग्राहक हेरल्यानंतर दलाल दुकानदाराशी मोबाइलवरून संपर्क साधतो. शटर उघडून ग्राहकाला आत नेले जाते. पोलीस आणि एनडीएस पथक आल्यानंतर सर्व दलाल गायब होतात. सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत या दलालांची सक्रियता दिसून येते. हा प्रकार कोरोना संसर्ग वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. अनेक होलसेल कापड व्यापारी विभागाशी सेटिंग करून व्यवसाय करीत असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
होलसेल क्लॉथ मार्केट परिसरात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्यानंतर हा परिसर हॉटस्पॉट घोषित केला होता. या ठिकाणी टिनाचे कठडे लावून मार्ग बंद करण्यात आला होता. पण कठडे हटल्यानंतर पुन्हा व्यवसाय सुरू झाला असून त्यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई होत नसल्याने त्यांचे फावत आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाची भीती पुन्हा वाढली आहे. पोलीस आणि मनपाने चोरून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.