भंडारण क्षमतेच्या विरोधात कळमनातील दलालांचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:08 AM2021-07-07T04:08:57+5:302021-07-07T04:08:57+5:30
नागपूर : केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना डाळींच्या साठवणुकीसाठी भंडारण क्षमता लागू केली आहे. या निर्णयाविरोधात शहरातील धान्य व्यापाऱ्यांनी रोष ...
नागपूर : केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना डाळींच्या साठवणुकीसाठी भंडारण क्षमता लागू केली आहे. या निर्णयाविरोधात शहरातील धान्य व्यापाऱ्यांनी रोष व्यक्त करीत बुधवारपासून काम बंद केले आहे. हे आंदोलन बुधवारपर्यंत सुरू राहील.
राज्य विधानसभेचे मुंबईत दोन दिवस पावसाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनात सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यानंतर गुरुवारी पुढील रणनीती निश्चित केली जाईल, अशी माहिती कळमना धान्यगंज अडतिया मंडळाचे अध्यक्ष अतुल सेनाड यांनी ‘लोकमत’ला दिली.
सेनाड म्हणाले, केंद्र सरकारने डाळींची भंडारण क्षमता लागू करण्याचा अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर सोपविली आहे. राजस्थान सरकारने ती लागू न करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकार पुढील दोन दिवसांत काय निर्णय घेणार, यावर आंदोलनाची दिशा निर्भर आहे.
सोमवारी कळमना धान्यगंज आडतिया मंडळाची तातडीची बैठक झाली. यात सर्व व्यापाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात कळमना धान्य मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सभेला रामेश्वर हिरुलकर, कमलाकर घाटोळे, सारंग वानखेडे, रामदास गजापुरे, चिंटू पुरोहित, महेंद्र अग्रवाल, दिनेश चांडक, स्वप्निल वैरागडे, रहमानभाई शेख, ज्ञानेश्वर गजभिये, राजेश सातपुते, शेखर अग्रवाल, मनोहर हजारे, सुरेश बारई, गोपाल कळमकर, पिंटू राऊत, भीमराव मुटे, स्वप्निल माटे, संजय अग्रवाल, मनीष घटे, विनोद कातुरे, दिनेश मौंदेकर, महादेव मेंढेकर, मनोज भालोटिया, आदी उपस्थित होते.
...
एका दिवसात एक कोटींची उलाढाल ठप्प
भंडारण क्षमता लागू करण्याच्या निर्णयाविरोधात मराठवाडा, विदर्भ आणि मध्य प्रदेशातील अनाज मंडी बंद होत असल्याचा दावा सेनाड यांनी केला आहे. नागपुरात सोमवारी कळमना मार्केट बंद राहिल्याने सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल थांबली. होलसेल ग्रेन अँड सीड्स मर्चंट्स असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी म्हणाले, विदर्भासह अन्य क्षेत्रातील अनाज मंडी बंद असल्याने आता नागपुरातील अनाज मंडीही बंद ठेवण्याबाबत व्यापाऱ्यांमध्ये विचार-विमर्श सुरू आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.
...