हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
By नरेश डोंगरे | Published: September 20, 2024 12:02 AM2024-09-20T00:02:42+5:302024-09-20T00:03:16+5:30
व्यवस्थापकांनी हाती झाडू घेतल्यावर अधिकारी वर्गानेही दिली साथ
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांनी गुरुवारी स्वत: हातात खराटा घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानकावर साफसफाई केली.
सध्या रेल्वेकडून स्वच्छता ही सेवा या विशेष अभियानाअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानके आणि वसाहती तसेच कार्यालय परिसरात साफसफाईची मोहिम राबविली जात आहे. स्वच्छतेचाा जागर करण्यासाठी विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे म्हणूनही प्रयत्न केले जात आहे. आपले घर आणि ज्या ज्या ठिकाणी जातो तो परिसर स्वच्छ ठेवा, घाण करू नका अन् घाण होऊ देऊ नका, असा मंत्रही दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानकावर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या व्यवस्थापक त्रिपाठी आपल्या सहकाऱ्यांसह आल्या आणि त्यांनी तेथे साफसफाई केली. यावेळी एस.पी. चंद्रिकापूरे. जी. व्ही. जगताप आणि अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सिंग यांच्या नेतृत्वात सायकल रॅली
याच मोहिमेंतर्गत दपूमचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांच्या नेतृत्वात स्पोर्टस असोसिएशनच्या वतिने मोतीबाग परिसरात सायकल रॅली काढण्यात आली. यात रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.