टुन्न फौजदाराची भाईगिरी
By admin | Published: February 27, 2016 03:17 AM2016-02-27T03:17:39+5:302016-02-27T03:17:39+5:30
दारूच्या नशेत टुन्न असलेल्या ग्रामीण पोलीस दलातील एका फौजदाराने (एएसआय) बेदरकारपणे वाहन चालवून मानकापूर परिसरात चांगलाच गोंधळ घातला.
नागपूर : दारूच्या नशेत टुन्न असलेल्या ग्रामीण पोलीस दलातील एका फौजदाराने (एएसआय) बेदरकारपणे वाहन चालवून मानकापूर परिसरात चांगलाच गोंधळ घातला. त्याच्या या बेजबाबदारपणामुळे झिंगाबाई टाकळी परिसरात शुक्रवारी दुपारी तणाव निर्माण झाला होता.
राकेश उत्तम यादव (वय ४५) असे गोंधळ घालणाऱ्या फौजदाराचे नाव आहे. तो गोधनीत राहतो. नागपूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी (परिक्षणार्थी) अजित हगवणे यांच्या वाहनावर यादव चालक आहे. हगवणे क्राईम मिटींगच्या निमित्ताने नागपुरात आले होते. शुक्रवार दुपारी २.३० सुमारास हगवणे बैठकीत असताना यादव नागमोते नामक पोलीस कर्मचाऱ्यासह शासकीय वाहनाने (एमएच ३१/ सीव्ही ५१) घराकडे निघाला. तो दारूच्या नशेत टुन्न होता. गीतानगर परिसरात कारला पोलीस जीपचा कट लागला.
कारवाईचा दिला दम
नागपूर : यादव खाली उतरला आणि कारचालकासोबत भाईगिरी करू लागला. पोलिसाच्या वाहनाला धडक मारल्याचा आरोप करून कारवाईचा दम देऊ लागला. पोलीसासोबत बाचाबाची सुरू असल्याचे पाहून तेथे मोठी गर्दी जमली. दारूच्या नशेत यादव भाईगिरी करीत असल्यामुळे अनेकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. नागरिकांमध्ये रोष निर्माण झाल्याने प्रकरण अंगलट येण्याचे संकेत मिळताच यादवचा साथीदार घटनास्थळावरून निघून गेला. संतप्त नागरिकांनी माहिती दिल्यामुळे मानकापूरचा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. त्यांनी कारचालक तसेच यादवला मानकापूर ठाण्यात नेले.
पहिल्याच बैठकीत ओळख
ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून अनंत रोकडे यांनी एक आठवड्यापूर्वी पदभार स्वीकारला. त्यांची ही पहिलीच क्राईम मिटींग होती. बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांची ओळख करून त्यांच्या भागात काय समस्या आहे, त्याची माहिती अधीक्षक करून घेत होते. तेवढ्यात यादवच्या प्रतापाचे वृत्त क्राईम मिटींगमध्ये पोहचले. नंतर पुढचे सर्वच विषय मागे पडले. पहिल्याच बैठकीत नवीन पोलीस अधीक्षकांना ग्रामीण पोलिसांच्या वृत्तीची ओळख झाली.(प्रतिनिधी)