बहिणीला जगविण्यासाठी भावाची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:42 AM2017-10-04T01:42:23+5:302017-10-04T01:42:33+5:30
३२ वर्षीय नाहिद हिचा आता कुठे संसार फुलला होता. पाच वर्षांचा मुलगा व सात वर्षांच्या मुलीमुळे घरपण आले होते. परंतु नियतीची चक्रे फिरली आणि काही कळण्याच्या आतच कठोर आघात सोसण्याची वेळ या गरीब कुटुंबावर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ३२ वर्षीय नाहिद हिचा आता कुठे संसार फुलला होता. पाच वर्षांचा मुलगा व सात वर्षांच्या मुलीमुळे घरपण आले होते. परंतु नियतीची चक्रे फिरली आणि काही कळण्याच्या आतच कठोर आघात सोसण्याची वेळ या गरीब कुटुंबावर आली. तिच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या. यावर उपचार सुरू असताना हृदयाच्या गंभीर आजाराचे निदान झाले. तिचा पती हातमजुरी करणारा. यामुळे भावाने त्याच्याकडे होता नव्हता तो सर्व पैसा उपचारात लावला. पुढील उपचार करण्यासाठी भावाची आता परिस्थिती राहिली नाही. बहिणीला जगवावे तरी कसे, या चिंतेने या कुटुंबाचे जीणे हराम झाले आहे. या कुटुंबाला संवेदनशील समाजाच्या भरीव आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.
बहिणीच्या उपचारासाठी काही करण्याची जिद्द बाळगून असलेले साजीद अंजुम हे त्या भावाचे नाव. नाहिद अंजुम कुरेशी (३२) रा. गड्डीगोदाम, हे त्याच्या बहिणीचे नाव.
घरची स्थिती नाजूक असताना साजीदने बहीण नाहिदला कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. तिचे शिक्षण केले. लग्न लावून दिले. तिचा संसाराचा गाडा रुळावर येत असतानाच नाहिदची प्रकृती खालवत गेली. तपासणीत दोन्ही किडनी निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच मोठा धक्का कुटुंबाला बसला. तरीही बहिणीला जगविण्याच्या जिद्दीने कर्ज काढून उपचार सुरू ठेवले. दीड वर्ष होत नाही तोच हृदयाचा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. यामुळे उपचाराचा खर्च वाढला. डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण करणे आवश्यक असल्याचे सांगून २५ लाख रुपयांची सोय करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून साजीद पैशांसाठी दारोदारी फिरतोय.
परंतु एवढा पैसा उभा करणे त्याच्यासाठी कठीण झाले आहे. समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास बहीण वाचेल, तिच्या मुलांना, घराला मोठा आधार मिळेल ही एकमेव आशा आहे.
हवे मदतीचे बळ
नाहिद अंजुम कुरेशी हिला समाजाच्या मदतीच्या हाताची गरज आहे. हीच मदत या कुटुंबाला पुन्हा एकदा लढण्याचे बळ-जगण्याची उभारी देऊ शकते. नाहिद अंजुम कुरेशी यांना मदत करू इच्छिणाºयांनी तिचा भाऊ साजीद अंजुम यांच्या सदर येथील जम्मू काश्मीर बँक खाता क्रमांक २९८०४०१००००५४४७ यावर धनादेश अथवा धनाकर्ष पाठवून मदत करावी. साजीद यांच्याशी ९३७०९९२०५९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.