टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांची वाहनचालकाला अमानूष मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 11:25 PM2023-12-13T23:25:27+5:302023-12-13T23:26:25+5:30
नागपूर - वर्धा मार्गावरच्या टोलनाक्यावरची घटना : लाठ्यांनी बदडले, व्हिडीओ व्हायरल.
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : कुठल्याशा किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांनी एका वाहन चालकाला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. वर्धा मार्गावरील वडगाव नजिकच्या टोल नाक्यावर बुधवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. येथून जाणाऱ्या एका वाहनचालकाने या अमाणूष मारहाणीचा व्हिडीओ काढून तो सोशल मिडियावर व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटना आणि कर्मचाऱ्यांच्या गुंडगिरीमुळे नेहमी चर्चेत असणारा 'टोल नाका' पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, एक तरुण वाहनचालक आज सायंकाळी या टोलनाक्यावरून वाहन घेऊन जात होता. टोलची रक्कम अन् दुसऱ्या कुठल्याशा कारणावरून टोलवरील कर्मचाऱ्यासोबत त्याची बाचाबाची झाली. त्यानंतर वाद वाढत गेला. त्यानंतर टोलवरील कर्मचारी तसेच गार्डसनी त्या तरुणाला हातबुक्क्या तसेच काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो तरुण गंभीर जखमी झाला. गंभीर परिणामाची कल्पना आल्यामुळे टोलवरील कर्मचाऱ्यांनी लगेच अॅम्बुलन्स बोलवली आणि त्याला नागपूरच्या दिशेने घेऊन गेले. त्या जखमी तरुणाचे नाव काय, तो कुठला आणि त्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले, ते कळले नाही. मात्र, या बेदम मारहाणीच्या घटनेच्या वेळी वर्धा येथील रहिवासी प्रवीण हिवरे जात होते. त्यांनी मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडीओ तयार करून तो आपल्या मित्रमंडळींना पाठवून सोशल मिडियावर व्हायरल केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, हिवरे यांनी या घटनेची लेखी तक्रार नागपूर विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठविली आहे.
विशेष म्हणजे, टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचे वर्तन अत्यंत उर्मट असल्याचे आणि वाहनधारकांसोबत ते अपमाणजनक पद्धतीने बोलतात, अशी नेहमीचीच ओरड आहे.
घटना घडल्याचे मान्य, मात्र...
या संबंधाने वादाचे कारण जाणून घेण्यासाठी या टोल नाक्याचे कामकाज बघणारे हर्षल देवके आणि राहुल डांगे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अशी घटना घडल्याचे मान्य केले. मात्र, टाळी एका हाताने वाजत नसल्याचे म्हणत 'त्या' कारचालकाने आधी टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्याचे दगडाने डोके फोडले. त्यामुळेच नाक्यावरील मुलांनी त्याला मारहाण केल्याचे म्हटले. जखमी तरुणाला बुटीबोरीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.