घरी उशिरा आली म्हणून महिलेचा निर्घृण खून; नागपुरातील वाडी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 10:37 AM2020-01-17T10:37:43+5:302020-01-17T10:38:09+5:30
घरी परत येण्यास उशीर झाल्याने चिडलेल्या तरुणाने महिलेला लाथाबुक्क्याने मारहाण करीत तिच्या कपाळावर बत्त्याने वार केले. त्यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपुरातील वाडी येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडी : घरी परत येण्यास उशीर झाल्याने चिडलेल्या तरुणाने महिलेला लाथाबुक्क्याने मारहाण करीत तिच्या कपाळावर बत्त्याने वार केले. त्यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे, दोघेही काही दिवसांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायचे. ही घटना बुधवारी (दि. १५) रात्री उघडकीस आली.
अलका टेंभेकर (२८) असे मृत महिलेचे नाव असून, सिद्धार्थ प्रेमजी सोनपिंपळे (३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोघेही सम्राट अशोक चौक, डॉ. आंबेडकर नगर, वाडी येथे राहायचे. अलका बुधवारी सकाळी सिद्धार्थला न सांगता बाहेर गेली होती. तिला घरी परत यायला उशीर झाल्याने तो चिडला होता. संशयी स्वभावाच्या सिद्धार्थने तिला उशिरा येण्याचे कारण विचारत तिच्याशी भांडायला सुरुवात केली. वाद विकोपास गेल्याने त्याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
एवढेच नव्हे तर त्याने तिच्या कपाळावर बत्त्याने वार करून जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेतील अलका गतप्राण होताच सिद्धार्थने तिथून पळ काढला. दिवसभर दारू पिऊन तो फिरत राहिला. त्यानंतर त्याने रात्री १० वाजताच्या सुमारास स्वत: पोलीस ठाणे गाठले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून अलकाचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. शिवाय, घटनास्थळाहून काही साहित्य जप्त करून सिद्धार्थला अटक केली. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ व सहायक पोलीस आयुक्त सिद्धार्थ शिंदे यांनी घटनास्थळावर घटनेची माहिती जाणून घेतली. या प्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. तपास ठाणेदार राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अमोल लाकडे करीत आहेत.
लिव्ह इन रिलेशनशिप
अलका ही मूळची भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असून ती विवाहित आहे. परंतु ती पतीजवळ न राहता सिद्धार्थसोबत त्याच्या सम्राट अशोक चौक, डॉ. आंबेडकर नगर वाडी येथील घरी रहात होती. सिद्धार्थदेखील विवाहित असून त्याने पत्नीला घटस्फोट दिला आहे. त्या दोघांनी अधिकृतरित्या लग्न केले नसले तरी ते आजवर पतीपत्नीसारखेच राहत होते.