बसपाचे उमेदवार झाले अपक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:10 AM2021-07-07T04:10:54+5:302021-07-07T04:10:54+5:30
उमरेड : उमरेड तालुक्यात पंचायत समितीच्या दोन वेगवेगळ्या गणासाठी होणाऱ्या निवडणुकीत एकूण ११ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. मंगळवारी ...
उमरेड : उमरेड तालुक्यात पंचायत समितीच्या दोन वेगवेगळ्या गणासाठी होणाऱ्या निवडणुकीत एकूण ११ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. मंगळवारी छाननीअंती सर्वच अर्ज वैध ठरले. देवळी (आमगाव) गणात राजकुमार लोखंडे यांनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना अंतिम क्षणापर्यंत एबी फॉर्मच मिळाला नाही. त्यामुळे बसपाच्या हत्तीवर त्यांना आरूढ होता आले नाही. आता ते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात राहतील. दुसरीकडे मकरधोकडा पंचायत समिती गणात बसपाच्या वतीने एकही अर्ज दाखल झाला नाही. मकरधोकडा गणात यापूर्वी झालेल्या निवडणुकीत तिरंगी सामना रंगला होता. यामध्ये काँग्रेसच्या शालू गिल्लुरकर यांनी ३,१३६ मते घेत भाजपच्या मीनाक्षी कावटे यांचा १,००२ मतांनी पराभव केला होता. कावटे यांना २,१३४ मते मिळाली. दुसरीकडे शिवसेनेच्या पंचफुला कुहिटे यांनीसुद्धा २,०१० मते पटकावीत चुरस निर्माण केली होती.
डिसेंबर २०१९ ला झालेल्या या निवडणुकीला आता जवळपास दीड वर्षाचा काळ लोटला. त्यामुळे पुन्हा एकदा या गणात जशास तसे उत्तर मिळेल आणि बिग फाइट होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. देवळी (आमगाव) गणात या वेळी भाजपने उमेदवार बदलविला आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या वतीने हिरामण नागपुरे मैदानात होते. त्यांना काँग्रेसच्या सुरेश लेंडे यांनी ५८९ मतांनी पराभूत केले. लेंडे यांना २,४१७ तर नागपुरे यांना १,८२८ मते मिळाली. या वेळी भाजपने दिलीप कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणीसुद्धा सामना रंगेल, असे चित्र दिसून येत आहे. कॉँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार राजू पारवे आणि माजी आमदार सुधीर पारवे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
३८ मतदान केंद्रांवर मतदान
उमरेड तालुक्यातील देवळी (आमगाव) या पंचायत समिती गणात एकूण २० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या गणात ४,९२० पुरुष मतदार तसेच ४,४३१ महिला मतदारांचा समावेश असून एकूण मतदारांची संख्या ९,३५१ आहे.
मकरधोकडा पंचायत समिती गणात एकूण १८ मतदान केंद्रांवर मतदान होईल. या गणामध्ये ५,५०४ पुरुष तसेच ५,०२४ महिला मतदार अशी एकूण १०,५२८ मतदारांची संख्या आहे.