अंतर्गत लाथाड्यांमुळेच बसपा कमकुवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:14 AM2019-06-25T10:14:35+5:302019-06-25T10:17:09+5:30

नेत्यांचा स्वार्थ आणि त्यातून निर्माण झालेल्या अंतर्गत लाथाड्यांमुळेच बसपा कमकुवत झाल्याचे सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

BSP weak because of internal fight | अंतर्गत लाथाड्यांमुळेच बसपा कमकुवत

अंतर्गत लाथाड्यांमुळेच बसपा कमकुवत

Next
ठळक मुद्देवरिष्ठ नेते काही शिकतील का?सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास हिरावला

आनंद डेकाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजन समाज पार्टी ही एक महत्त्वाची राजकीय शक्ती मानली जाते. आजवर बसपाचा एकही उमेदवार विधानसभा किंवा लोकसभेत निवडून आला नसला तरी, भाजप-काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयाची गणिते ठरवण्याइतपत ताकद बसपाने निर्माण केली होती. परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ही ताकद नाहीशी झाल्याचे दिसून आले. लाखावर मत घेणारी बसपा आता केवळ ३१ हजारावर आली ? असे का झाले? नेत्यांचा स्वार्थ आणि त्यातून निर्माण झालेल्या अंतर्गत लाथाड्यांमुळेच बसपा कमकुवत झाल्याचे सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. हा असंतोष आता चव्हाट्यावर आला आहे. सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास हिरावला जात आहे. लवकरच विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा वरिष्ठ नेते यातून काही शिकणार की नाही, असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.
कॅडरबेस कार्यकर्त्यांच्या भरवशावर बसपाने राज्यात आपली एक शक्ती निर्माण केली. नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघ मिळून दोन लाखाची व्होट बँक तयार झाली. प्रत्येक निवडणुकीत बसपाच्या हत्तीची गती ही वाढलेली दिसून येते. २००९ मध्ये माणिकराव वैद्य यांना बसपाने उमेदवारी दिली. तेव्हा बसपाने पहिल्यांदा १ लाखावर मतांचा पल्ला गाठला. वैद्य यांनी तब्बल १ लाख १८ हजार ७४१ मते घेतली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. मोहन गायकवाड यांना बसपाने उमेदवारी दिली. त्यांनीही ९६,४३३ मते घेत बसपाची ताकद कायम ठेवली. विधानसभा
निवडणुकीतही उत्तर नागपूरसारख्या महत्त्वाच्या विधानसभा मतदार संघात बसपाकडून लढलेले किशोर गजभिये हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. बसपाच्या या वाढत असलेल्या ताकदीमुळे सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वासही दुणावला.
या निवडणुकीत बसपा निश्चितच कमाल करेल, असा विश्वास सामान्य कार्यकर्त्यांना होता. परंतु तसे झाले नाही. उलट अंतर्गत लाथाड्या अधिक वाढल्या. पक्षातील वाद कधी नव्हे इतका चव्हाट्यावर आला. पक्षाचे लोकसभा उमेदवार मो. जमाल यांच्यावरच पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले. जमाल यांनीही वरिष्ठ नेत्यांनीच पक्षविरोधी काम केल्याचे आरोप केले.
निवडणुकीतील हा असंतोष नागपुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. अमरावतीमध्ये याचा स्फोट झाला. संदीप ताजने व चेतन पवार या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांना मारही बसला. या नेत्यांनी पक्षविरोधी कार्य केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप होता. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ताजने, पवार यांची पक्षातून हकालपट्टी केली. काहींना पदमुक्त केले. परंतु कार्यकर्त्यांमधील असंतोष अजूनही शमलेला नाही. नेत्यांनी कार्यकर्त्यांचा विश्वास गमावलेला आहे. विधानसभा निवडणुका लवकरच येऊ घातल्या आहेत. अशापरिस्थितीत सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा संपादित करणे, हे प्रदेशस्तरावरील नेत्यांसमोर मुख्य आव्हान राहणार आहे.
नागपूर झोनची बैठक वादळी ठरण्याची शक्यता
येत्या ३० जून रोजी नागपूर झोनची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. अमरावती येथील घटनेची गंभीर दखल घेऊन मायावती यांनी ताजने व पवार यांची पक्षातून हकालपट्टी करून सामान्य कार्यकर्त्यांचा रोष काही प्रमाणात कमी केला असला तरी, नागपुरातील कार्यकर्त्यांमध्येही असंतोष पसरलेला आहे. तो नागपूरच्या बैठकीत उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: BSP weak because of internal fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.