दीक्षाभूमीवर अवतरणार बुद्ध कला व संस्कृती

By admin | Published: January 10, 2015 02:46 AM2015-01-10T02:46:53+5:302015-01-10T02:46:53+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाही दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत येत्या १७ ते २५ जानेवारी या कालावधीत दीक्षाभूमीवर बुद्ध कला व ..

Buddha Arts and Culture | दीक्षाभूमीवर अवतरणार बुद्ध कला व संस्कृती

दीक्षाभूमीवर अवतरणार बुद्ध कला व संस्कृती

Next

नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत येत्या १७ ते २५ जानेवारी या कालावधीत दीक्षाभूमीवर बुद्ध कला व प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. यंदाचे खास आकर्षण म्हणजे विश्वविख्यात सरोदवाद उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोदवादनाचा आनंद नागपूरकरांना अनुभवता येईल. तसेच गझल गायक भीमराव पांचाळे यांच्या गझलांचीही मेजवानी उपभोगता येईल.
त्रिरत्न बुद्ध महासंघाच्या नागपूर बुद्धिस्ट सेंटरच्यावतीने दीक्षाभूमीवर पाचवा बुद्ध महोत्सव येत्या १७ जानेवारीपासून आयोजित करण्यात आला आहे. यासंबंधात बुद्धिस्ट सेंटरचे अध्यक्ष रितायुष यांनी यासंबंधात आज दीक्षाभूमी येथे पत्रपरिषदेत माहिती दिली.
१७ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. याप्रसंगी चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर, डॉ. हर्षवर्धन कांबळे, धम्मचारी सुभूती (इंग्लंड) हे प्रमुख अतिथी राहतील. १८ जानेवारी रोजी सायंकाळी विश्वविख्यात सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांच्या संगीताची मेजवानी नागपूरकरांना घेता येईल. औरंगाबाद येथील शास्त्रीय गायक अंबरीश देगुळकर हे २३ ला तर सुप्रसिद्ध गझल गायक भीमराव पांचाळे यांचे मराठी गझल गायन २४ तारखेला सायंकाळी होईल.
रत्नावली या प्रवचन मालिकेंतर्गत १९ ते २२ जानेवारीदरम्यान बौद्ध धम्मातील मानवी रत्नांच्या जीवनावर विचारवंतांच्या प्रवचनातून बौद्ध धम्माचा प्राचीन इतिहास आणि वैभवशाली परंपरा यांचे पुन:स्मरण करण्यात येईल. त्रिरत्न बौद्ध महासंघाचे वरिष्ठ धम्मचारी आणि लेखक धम्मचारी सुभूती (इंग्लंड) यांचे प्रथम व्याख्यान भारतीय प्राचीन बौद्ध विद्वान असंग आणि वसूबंधू या दोन भावंडांवर १९ जानेवारीला होईल. धम्मचारी यशोसागर हे बौद्ध आचार्य पद्मसंभव यांच्या जीवन कार्यावर २० तारखेला प्रकाश टाकतील. तिबेटीयन उच्च अध्ययन संस्थान येथील डॉ. बॉगचूक दोरजे नेगी हे आचार्य शांतीदेव यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकतील. तर अनागारिक धम्मपाल यांच्या जीवन कार्यावर भदंत रेवत हे प्रकाश टाकतील. यासोबतच जपान आणि अमेरिकेतून आलेले बौद्ध बांधव हे सुद्धा धम्मजीवनाचे अनुभव विशद करतील. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने धम्मचारी विमलसारा या मार्गदर्शन करतील. हेमंत सुटे आणि त्यांचे सहकारी करिअर गायडन्स यावर मार्गदर्शन करतील. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण हे नेहमीच येथील विचारपीठ राहिलेले आहे. यंदा पाच बुद्ध मंडलवर आधारित व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला धम्मचारी नागकेतू, डॉ. सुनील तलवारे, डॉ. त्रिलोक हजारे, सचिन हाडके आणि अमन कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

एक हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक मैत्रीगीत
२५ जानेवारी रोजी या महोत्सवाचा समारोप विचारवंत हनुमंतराव उपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. त्यापूर्वी नागपुरातील विविध शाळांमधील सुमारे एक हजार विद्यार्थी सामूहिक मैत्रीगीत सादर करतील.

Web Title: Buddha Arts and Culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.