'शिल्पकार जगाचा' मध्ये सादर झाली बुद्ध-भीमगीते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 01:20 AM2019-04-14T01:20:14+5:302019-04-14T01:21:00+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने आयोजित सूमधूर गीतांचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. त्यात विविध गीतांच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने आयोजित सूमधूर गीतांचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. त्यात विविध गीतांच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आले.
घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पर्वावर म्युझिक टाइम ऑर्केस्ट्राच्यावतीने ‘शिल्पकार जगाचा’ हा सुमधूर बुद्ध-भीम गीतमालेचा कार्यक्रम शनिवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. या कार्यक्रमाची संकल्पना सुनील गजभिये व मित्र परिवाराची होती. पार्श्वगायक डॉ. अनिल खोब्रागडे, पार्श्वगायिका धनश्री बुरबुरे यांच्यासह चंद्रपूरच्या निशा धोंगडे, श्रद्धा यादव, शिलवंत सोनटक्के, गोल्डी हुमने, मनीष राय, मनोज बहादुरे हे कलाकार बुद्ध गीते व भीम गीते सादर केली. आकाशवाणीचे ज्येष्ठ निवेदक अशोक जांभुळकर यांच्या निवेदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिलवंत यांनी ‘भीमा तुला वंदना’ या गीताच्या माध्यमातून अभिवादन करीत गीत सादर केले. धनश्री यांनी ‘अमृतवाणी ही बुद्धाची’ हे गीत सादर केले. शिलवंत यांनी ‘ही पाकळी पाकळी’ तर मनीषने ‘चंदनपरी तु झिजला’हे गीत दमदारपणे सादर केले. डॉ. अनिल खोब्रागडे यांनी ‘भीमा तुझ्या पथावर’ व ’चंदन वृक्षासमान’ ही गीते सादर करून रसिकांच्या टाळ्या खेचल्या. त्यानंतर ज्योती भगत मंचावर आल्या. त्यांच्या सूत्रसंचालनात गोल्डी हमने यांनी हे गीत सादर केले. ’भिमा घे पुन्हा’ या गोल्डी व शिलवंत यांनी सादर केलेल्या गीताला वन्समोअर मिळाला. ’प्रथम नमो गौतमा’,भीमराया घे’ अशी विविध सुमधूर गीते गायकांनी यावेळी सादर केली.
वृद्धाश्रम आणि सेवाश्रम चालविणाऱ्या जीवन आश्रय सेवा संस्थेच्या साहाय्यार्थ हा कार्यक्रम घेण्यात आला. संयोजन म्युझिक टाइम ऑर्केस्ट्राचे शैलेश ढोके यांचे होते तर संयोजक सुनील आर. गजभिये, शैलेश जांभुळकर, अनिल सिरसाट, बी. के. सहारे होते.