दीक्षाभूमीवर आजपासून बुद्ध महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 07:00 AM2022-06-15T07:00:00+5:302022-06-15T07:00:02+5:30
Nagpur News तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथे रविवारपासून तीन दिवसीय बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
नागपूर : तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथे रविवारपासून तीन दिवसीय बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
१५ मे रोजी दीक्षाभूमी येथे सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या मार्गदर्शनात भिक्खू संघाचे प्रवचन होणार आहे. यावेळी भदन्त थेरो धम्मसारथी, भदन्त थेरो नागवंश, भदन्त थेरो नागाप्रकाश, भिक्खूनी संघप्रिया आदींचे प्रवचन होईल. बुद्ध जयंतीच्या दिवशी म्हणजे १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित बुद्धधम्म या विषयावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम होईल. याप्रसंगी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, प्रा. देवीदास घोडेस्वार, डॉ. प्रदीप आगलावे आणि हरीश सुखदेवे मार्गदर्शन करतील. १७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सूरमणी प्रभाकर धाकडे, प्रा. अनिल खोब्रागडे, छाया वानखेडे आणि त्यांचा संच बुद्ध-भीमगीते सादर करेल.
- ड्रॅगन पॅलेस येथे महापरित्राण पाठ, सामूहिक ध्यान साधना, धम्मदेसना
वैशाख बुद्ध पौर्णिमेनिमित्त कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले आहे. येथे रविवारपासून महापरित्राण पाठ, सामूहिक विपश्यना ध्यान साधना, धम्मदेसना, शांती कॅण्डल मार्च इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ मे राेजी सकाळी ८ वाजता विपश्यना मेडिटेशन सेंटर येथे सामूहिक विपश्यना ध्यान साधना व मंगल मैत्री होईल. सायंकाळी ७ वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत पूज्य भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत महापरित्तदेसना व महापरित्राण पाठ होईल. भदन्त नागदीपंकर, भदन्त मेथानंद, भदन्त बोधिरत्न, भदन्त नंदिता प्रामुख्याने उपस्थित राहतील. १६ मे रोजी सकाळी ९ वाजता विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना होईल. माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते भिक्खू संघाला चिवरदान व भोजनदान देण्यात येईल. सायंकाळी ७ वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र ते ड्रॅगन पॅलेस टेम्पलपर्यंत शांती कॅण्डल मार्च काढण्यात येईल.