बडी दूर से आये है... प्यार का तोहफा लाये है..!!

By admin | Published: September 7, 2015 03:01 AM2015-09-07T03:01:47+5:302015-09-07T03:01:47+5:30

चित्रपट संगीताचे सुवर्णयुग गाजविणारे सुप्रसिद्ध संगीतकार म्हणजे कल्याणजी-आनंदजी. या जोडगोळीने दिलेल्या संगीतावर अनेक पिढ्यांचे भावविश्व पोसले गेले आहे.

Buddha has come from a far away ... gift of love is brought .. !! | बडी दूर से आये है... प्यार का तोहफा लाये है..!!

बडी दूर से आये है... प्यार का तोहफा लाये है..!!

Next

संगीतकार आनंदजी शाह यांच्याशी संवाद :
उलगडल्या जुन्या गीतांच्या आठवणी
नागपूर : चित्रपट संगीताचे सुवर्णयुग गाजविणारे सुप्रसिद्ध संगीतकार म्हणजे कल्याणजी-आनंदजी. या जोडगोळीने दिलेल्या संगीतावर अनेक पिढ्यांचे भावविश्व पोसले गेले आहे. प्रतिभावंत गायक, सर्जनशील कवी, गीतकारांनी लिहिलेल्या गीतांना स्वरांचे अनवट कोंदण देणारे आणि रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य करणारे संगीतकार कल्याणजी-आनंदजी. राजकपूरपासून अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांच्या अनेक चित्रपटांना संगीत देतांना त्यातली गीते या जोडगोळीने अजरामर केलीत. त्यात पार्श्वगायक मुकेश, किशोरदा, मो. रफी, लतादीदींसारख्या तयार गायकांनी आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर ही गीते कोरली आहे. या जोडगोळीतल्या आनंदजी शाह यांच्याकडूनच त्यांनी संगीतबद्ध केलेले गीत ऐकणे, गीतांचे संदर्भ, आठवणी समजून घेणे रसिकांसाठी सुवर्णकांचन योग. आनंदजी आले, गीत सादर केले, संवाद साधला आणि त्यांनी नागपूरकरांना जिंकले.
सूरसंगम आणि मैत्री परिवार संस्थेच्यावतीने आनंदजी यांच्याशी संवाद साधत त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा ‘जिंदगी का सफर..’ हा कार्यक्रम रविवारी डॉ. देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी आनंदजी मंचावर येताच नागपूरकर रसिकांनी उभे राहून त्यांचा सन्मान केला.
या कार्यक्रमातून मिळालेला निधी गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारल्यानंतर आनंदजींनी ‘बडी दूर से आये है...प्यार का तोहफा लाये है...’ हे गीत सादर करुन तुमच्यासाठी आठवणींचा खजिना घेऊन मी आलो आहे, असे सांगितले.
मिश्किल स्वभावाच्या आनंदजींनी प्रासंगिक विनोद करीत रसिकांना हसत-हसवित ठेवत अनेक गीतांचे संदर्भ, आठवणी आणि गीतांची चाल कशी सुचली, याचा उहापोह केला.
निवेदक डॉ. मनोज साल्पेकर यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देत त्यांनी यावेळी काही गीतेही सादर केलीत आणि प्रेक्षकांची दाद घेतली. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन महेंद्र ढोले आणि सचिन ढोमणे यांनी केले.
यावेळी शहरातील लोकप्रिय गायक सागर मधुमटके, यशश्री भावे, सारंग जोशी, योगेंद्र रानडे, अरविंद पाटिल, अंचल शर्मा आणि सुप्रसिद्ध गायिका सुरभी ढोमणे यांनी तयारीने गीते सादर करुन रसिकांना आनंद दिला.
याप्रसंगी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली ‘रोते हुअ‍े आते है सब.., वक्त करता जो वफा.., मेरे तुटे हुअ‍े दिल को.., डम डम डिगा डिगा.., कोई जब तुम्हारा हृदय तोडदे..., चंदन सा बदन.., यु ही तुम मुझसे बात करती हो..किसी राह मे...’
आदी अनेक लोकप्रिय गीते सादर करण्यात आली. प्रारंभी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख, माजी खा. विलास मुत्तेमवार, महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते आनंदजींचा त्यांच्या पत्नी शांताबेन यांच्यासह शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन नागपूरकरांच्यावतीने गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)
नागपूरकर संगीताचे जाणकार
नागपुरातील कार्यक्रमासाठी मला निमंत्रण मिळाले तेव्हा मी जरा घाबरलो. नागपुरात मी १९५४ पासून येत आहे. येथील रसिक संगीताचे दर्दी आणि जाणकार आहेत. त्यामुळे येथे कार्यक्रम करताना दडपण यायचे. पण दर्दी रसिकांसमोर येताना मला आज आनंद वाटतो, असे सांगताना आनंदजींनी पत्नीला नागपूरकरांच्या पाया पडायला सांगितले आणि हंशा पिकला. लग्न झाल्यावर माणसाला पत्नीचे किती ऐकावे लागते आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य कसे संपते याचे अनेक किस्से मिश्किलपणे सांगतांना त्यांनी बायको या विषयावर विनोद करून कार्यक्रमाची रंगत कायम ठेवली.

Web Title: Buddha has come from a far away ... gift of love is brought .. !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.