बुद्ध प्रतिमा उभारली, दीक्षाभूमी मिळाली : जागेसाठी करावा लागला संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 01:00 AM2019-10-06T01:00:08+5:302019-10-06T01:00:59+5:30

एका रात्रीत तथागत बुद्धाची प्रतिमा उभारली व पुढे कायदेशीर लढा लढला, तेव्हा कुठे आज डोळ्यात साठवावे असे स्मारक दिसते आहे.

Buddha image built , got Dikshabhoomi: struggle for space | बुद्ध प्रतिमा उभारली, दीक्षाभूमी मिळाली : जागेसाठी करावा लागला संघर्ष

बुद्ध प्रतिमा उभारली, दीक्षाभूमी मिळाली : जागेसाठी करावा लागला संघर्ष

googlenewsNext
ठळक मुद्देबाबू हरिदास यांनी दिला निकराचा लढा

निशांत वानखेडे/ लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी आंबेडकरी अनुयायांना नेहमी संघर्ष करावा लागला आहे. या संघर्षातून दीक्षाभूमीचे स्मारकही सुटले नाही. खरतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. संविधानाचे रचनाकार व आधुनिक भारताच्या निर्मात्या या युगनायकाच्या ऐतिहासिक परिवर्तनाची जागा स्मारकासाठी सहज उपलब्ध करणे सरकारतर्फे अपेक्षित होते. मात्र या जागेसाठीही संघर्ष करावा लागला आणि या लढ्याचे नायक होते कर्मवीर बाबू हरिदास आवळे. त्यांनी एका रात्रीत तथागत बुद्धाची प्रतिमा उभारली व पुढे कायदेशीर लढा लढला, तेव्हा कुठे आज डोळ्यात साठवावे असे स्मारक दिसते आहे.
धम्मदीक्षा सोहळा हा बोैद्ध अनुयायांच्या जीवनातील आमूलाग्र बदल करणारा क्षण ठरला आणि ही भूमी प्रेरणाभूमी ठरली. त्यामुळे या भूमीवर भव्य स्मारक निर्माण व्हावे याचे वेध त्यावेळी कार्यकर्त्यांना लागले. १९५६ साली बाबासाहेब यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर आवळे बाबू यांच्या पुढाकाराने दीक्षाभूमीवर पहिली शोकसभा झाली आणि याच शोकसभेत स्मारक निर्मितीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यासाठी प्रयत्न सुरू झाले. आवळे बाबू म्हणजे आंबेडकरी चळवळीचा झंझावातच होते. महापालिका ते राज्य शासनातील मंत्र्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदने, विनंती त्यांनी केली. परंतु निवेदनातून, विनंती करून काही सार्थक होणार नाही, हे त्यांना कळायला लागले. त्यांनी न्यायालयाचा लढाही लढला. पण यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी दर रविवारी या भूमीवर ‘बुद्ध व त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन व बुद्ध वंदना घेणे सुरू केले. हळूहळू गर्दी वाढू लागली, तसे पोलिसांचे कान टवकारले. या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढली. पण काही दिवसांनी तेही कंटाळले. हीच संधी साधून आवळे बाबूंनी १९५७ साली बाबासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्रिशरण-पंचशील, बुद्धवंदना, संघवंदना ग्रहण कार्यक्रम घेतला. कार्यक्रम सुरू झाला तसा मध्ये निळा पडदा लावला गेला. पडद्याच्या एका बाजूला जयंतीचा उत्सव, भाषणे सुरू होती तर दुसऱ्या बाजूला खड्डा खोदण्याचे काम सुरू होते. रात्री ९ वाजता खड्डा खोदण्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर तीन हातठेल्यांवर वाळू, विटा, सिमेंट, मुरूम आणि पाण्याचे दोन ड्रम दीक्षाभूमीवर आणून स्तंभ उभारला गेला.
धोंडबाजी मेंढे, मनोहर गजघाटे, बिसन गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी कमलपुष्पात तयार केलेली बुद्धमूर्ती गोपालनगर चौकात तयार ठेवली होती. मध्यरात्री बुद्धमूर्ती दीक्षाभूमीवर आणली गेली व स्तंभावर बसवली गेली. ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. सीताबर्डी पोलीस दीक्षाभूमीवर तैनात झाले. बुद्धमूर्ती बसवणाऱ्यांचा शोध सुरू झाला. त्यावेळी आवळेबाबू नावाच्या झपाटलेल्या कार्यकर्त्याने ‘मी बुद्धमूर्ती बसवली, जे करायचे ते करा’ असे छातीठोक आव्हान दिले. न्यायालयात हे प्रकरण गेले. त्यांच्यावर खटला भरला, परंतु ते मागे हटले नाहीत.
तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सत्कारासाठी सर्वपक्षीय समिती तयार करण्यात आवळेबाबूंनी पुढाकार घेतला. जुलै १९५८ रोजी मुख्यमंत्री चव्हाण नागपुरात आले. त्यावेळी नागपूरचे डॉ. ना. भ. खरे यांच्या बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची चहापान सभा झाली. ही संधी न सोडता कम्युनिस्ट पक्षाचे भाई बर्धन, बच्छराज व्यास, डॉ. खरे, पत्रकार हरकिसन अग्रवाल, काकिरवार, आमदार पंजाबराव शंभरकर, रामरतन जानोरकर यांच्या स्वाक्षºया घेऊन दीक्षाभूमी बौद्धांना देण्यात यावी, असे संयुक्त निवेदन मुख्यमंत्री चव्हाण यांना दिले. त्यांनीही तोंडी आश्वासन दिले. आवळे बाबू २१ जुलै १९६० मध्ये विधानसभेत, ‘ऐतिहासिक अशा धम्मदीक्षेची भूमी आम्हाला मिळावी. विकत देण्यास तयार असाल तर किंमत बोला, ती मोजायला आम्ही तयार आहोत’, असे रोखठोक आवाहन देत सरकारवर गरजले. या रेट्यात भाई बर्धन यांनी विधानसभेत ‘दीक्षाभूमी बौद्धांना देण्याचे आश्वासन पाळावे’ असा मुद्दा उपस्थित केला. चव्हाण सरकारनेही पुढे जनरेट्यापुढे बौद्धांना ही भूमी देण्याचे आश्वासन पाळले. सुरुवातीला ४ एकर देण्याचे ठरले पण ही जागा अपुरी पडत असल्याने १४ एकराची मागणी लावून धरण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे यशवंतराव आंबेडकर आणि खासदार दादासाहेब गायकवाड यांना जागेसंदर्भातील उपाययोजना करण्याची जबाबदारी दिली गेली. दीक्षाभूमीचा भूखंड मिळाला आणि त्या ऐतिहासिक भूमीवर डॉ. आंबेडकर स्मारक समितीतर्फे दादासाहेब गवई यांच्या प्रयत्नाने देखणे असे भव्य स्मारक उभे झाले.

Web Title: Buddha image built , got Dikshabhoomi: struggle for space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.