पंतप्रधान नरेंद्र मोदींना विदेशातच बुद्ध आठवतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 07:39 PM2018-03-17T19:39:16+5:302018-03-17T19:43:38+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा विदेशात जातात तेव्हा तेव्हा त्यांना भगवान बुद्धाच्या अंहिसेची शिकवण आठवते. या शिकवणीचा ते विदेशात अभिमानाने उल्लेखही करतात. भारतात परतल्यावर मात्र त्यांना बुद्ध फारसा आठवत नाही, अशी टीका भदंत खेमचारा यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा विदेशात जातात तेव्हा तेव्हा त्यांना भगवान बुद्धाच्या अंहिसेची शिकवण आठवते. या शिकवणीचा ते विदेशात अभिमानाने उल्लेखही करतात. भारतात परतल्यावर मात्र त्यांना बुद्ध फारसा आठवत नाही, अशी टीका भदंत खेमचारा यांनी केली. संजीवनी ह्युमन डेव्हलपमेंट सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान आणि आवाज इंडिया टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर सभागृहात आयोजित दोन दिवसीय पाली साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भदंत महाथेरो तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भदंत उपनंद, भदंत बोधीपालो, भदंत मेतानंद, भदंत उपनंद, डॉ. प्रफुल्ल गडपाल, डॉ. राजेश चंद्रा, संघमित्रा जाधव व आयोजक अमन कांबळे व प्रीतम बुलकुंडे उपस्थित होते. खेमचारा पुढे म्हणाले, देशभरात बौद्ध बांधव राहतात. त्या त्या प्रदेशातील संस्कृतीचा त्यांच्यावर प्रभाव असतो. पण, अनेक जण त्यांना नवबौद्ध असे संबोधतात. हे चुकीचे आहे. बुद्धाला मानणारे सगळेच बौद्ध आहेत. पाली भाषा ही तथागताच्या विचारांची वाहिका आहे. त्यामुळे तिच्या संवर्धनासाठी घराघरात पाली बोलली गेली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. डॉ. प्रफुल्ल गडपाल, डॉ. राजेश चंद्रा यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रितम बुलकुंडे, बीजभाषण भदंत मेतानंद यांनी केले. या दोन दिवसीय या संमेलनात देशभरातील तज्ज्ञ पाली भाषेबाबत मार्गदर्शन करणार आहेत.