बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्ध नास्तिक आहे

By admin | Published: February 19, 2017 02:30 AM2017-02-19T02:30:35+5:302017-02-19T02:30:35+5:30

भगवान बुद्ध हे मोक्षदाता नाहीत, मार्गदाता आहेत. बुद्धाने सांगितलेला धम्म हा भावनेवर नव्हे तर्कावर उभा आहे.

Buddha said that the Buddha is atheist | बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्ध नास्तिक आहे

बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्ध नास्तिक आहे

Next

लक्ष्मण माने : डॉ. आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला
नागपूर : भगवान बुद्ध हे मोक्षदाता नाहीत, मार्गदाता आहेत. बुद्धाने सांगितलेला धम्म हा भावनेवर नव्हे तर्कावर उभा आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा स्वीकार केला. बाबासाहेबांनी जो बुद्ध अभ्यासला तो पूर्णत: नास्तिक आणि विज्ञानवादी आहे. परंतु दुर्दैवाने आज बाबासाहेबांनी सांगितलेला वैचारिक बुद्ध मागे पडत असून त्या जागी कर्मकांडात गुरफटलेला बुद्ध उभा केला जात आहे, अशी खंत साहित्यात भटक्या समाजाचे दु:ख शब्दबद्ध करून त्यांचे जीवनमान जगासमोर आणणारे विचारवंत पद्मश्री लक्ष्मण माने यांनी व्यक्त केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागातर्फे आयोजित डॉ. आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. या दोन दिवसीय व्याख्यानमालेचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे तर प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम व आयोजक डॉ. प्रदीप आगलावे मंचावर उपस्थित होते. ‘२१ व्या शतकातील भारतातील बुद्ध धम्माची चळवळ’ या विषयावर बोलताना माने पुढे म्हणाले, कितीही धर्मांतर करा, परंतु जात काही जात नाही, हा अनुभव मी सातत्याने घेत आहे. मला धम्म स्वीकारून १० वर्षे झालीत. परंतु अद्याप धम्माच्या अनुयायांनीच मला स्वीकारलेले नाही. दलाईलामा तर जणू बुद्धाला बदनाम करायलाच बसले आहेत. तिकडे ओशोचे विचारही त्याला वाटते त्या पद्धतीने बुद्धाच्या आवरणात गुंडाळून समाजात पोहोचवले जात आहेत. चीन, जपान, तिबेट या राष्ट्रांमध्ये तर बुद्धाला चमत्कारिक देवत्व प्रदान केले जात आहे, असे माने म्हणाले. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. प्रदीप आगलावे, संचालन डॉ. रमेश शंभरकर यांनी केले.(प्रतिनिधी)

संघ आमचा जगजाहीर शत्रू
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमचा जगजाहीर शत्रू आहे. परंतु नुसते संघाच्या नावाने बोटे मोडून उपयोग नाही. त्यांच्या अतिरेकी हिंदुत्वाला तार्किक विरोध करायचा असेल तर आधी संघासारखी शिस्तबद्ध आणि समर्पित चळवळ उभारावी लागेल. परंतु येथे चित्र उलटे आहे. बाबासाहेबांचे नाव घेणारी काही माणसे कमळावर निवडणूक लढवित आहेत. स्वार्थासाठीचे हे वैचारिक धु्रवीकरण आम्हाला कुठे नेईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
 

Web Title: Buddha said that the Buddha is atheist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.