राज्यातील बुद्ध विहारांना एकसूत्रात बांधणार
By admin | Published: April 2, 2016 03:28 AM2016-04-02T03:28:15+5:302016-04-02T03:28:15+5:30
बौद्ध समाजाला एकासूत्रात बांधण्यासाठी राज्यभरातील बुद्ध विहारांना, सामाजिक संस्थांना व कार्यकर्त्यांना एकासूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बौद्धांची शिखर संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न : बुद्ध विहार समन्वय समितीचा पुढाकार
नागपूर : बौद्ध समाजाला एकासूत्रात बांधण्यासाठी राज्यभरातील बुद्ध विहारांना, सामाजिक संस्थांना व कार्यकर्त्यांना एकासूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी बुद्ध विहार समन्वय समितीने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत नागपुरातून याची सुरुवात झाली असून आतापर्यंत नागपुरातील २०० विहारांना परिषदेच्या माध्यमातून जोडण्यात यश आले आहे. या माध्यमातून बौद्ध समाजाची एक शिखर संस्था स्थापन करण्याचा उद्देश आहे.
बुद्ध विहार समन्वय समितीचे मुख्य संयोजक अशोक सरस्वती यांनी सांगितले की, धम्म क्रांतीनंतर जमेल तसे आपण बुद्ध विहार बांधलेत. प्रशिक्षणाच्या व निर्देशनाच्या अभावामुळे त्यात अनवधानाने अनेक त्रुटी राहून गेल्या. त्यात कुणाचाच दोष नव्हता. त्याला कालमानाच्या मर्यादा होत्या. त्या त्रुटींना दुरुस्त करण्याची गरज सर्वांनाच जाणवत आहे. परंतु सर्वसामान्य नेतृत्वाच्या अभावामुळे कुणी कुणाला सांगावे आणि कुणी कुणाचे ऐकावे हा गहन प्रश्न निर्माण झाल्याने समाजात गोंधळ, भ्रम, कलह निर्माण झाला. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातील सर्व लहान मोठ्या बुद्ध विहारांचा समन्वय करून त्याची नियंत्रण करणारी केंद्रीय यंत्रणा असलेली शिखर संस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने बुद्ध विहार समन्वय समिती स्थापन करण्यात आली. २०२० पर्यंत राज्यातील सर्व विहारांची व धम्म प्रचारकांचा समन्वय स्थापन करण्याचे निश्चित केले आहे.
२०१४ पासून कामाला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी नागपूर शहरातील ७० विहारांचा समन्वय स्थापन करण्यात आला. दुसऱ्या वर्षी १२५ आणि यावर्षी २०० विहारांचा समन्वय स्थापन झालेला आहे. २०१७ पर्यंत संपूर्ण नागपूर शहर, २०१८ पर्यंत संपूर्ण जिल्हा, २०१९ पर्यंत विदर्भ आणि २०२० पर्यंत संपूर्ण राज्यातील विहिरांचा समन्वय केला जाईल. यासाठी जनजागृती म्हणून दरवर्षी बुद्ध विहारांची समन्वय परिषद स्थापन केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बुद्ध विहार समन्वय परिषद आजपासून
रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृह हिंदी मोरभवन झाशी राणी चौक सीताबर्डी येथे दोन दिवसीय बुद्ध विहार समन्वय परिषद आयोजित करण्यात आली आहे. २ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता परिषदेला सुरुवात होईल. सकाळी ११.३० वाजता माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन होईल. भदंत विमलकिर्ती गुणसिरी अध्यक्षस्थानी राहतील. डॉ. कृष्णा कांबळे, अशोक शंभरकर प्रामुख्याने उपस्थित राहतील. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध विषयावर चर्चा होईल.