बुद्धसूर्य विहार, नागलोक धम्म ज्ञानाचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:07 PM2019-05-18T12:07:13+5:302019-05-18T12:08:20+5:30
बौद्धधम्माचा प्रचार व प्रसारासाठी ‘बुद्धिस्ट सेमिनरी’ आणि बौद्ध विहार स्थापन व्हावे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. त्या दिशेने त्रिरत्न बौद्ध महासंघ आणि नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने उचललेले पाऊल म्हणजे, कामठी रोडवरील नागलोक येथील बुद्धसूर्य विहार.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बौद्धधम्माचा प्रचार व प्रसारासाठी ‘बुद्धिस्ट सेमिनरी’ आणि बौद्ध विहार स्थापन व्हावे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. त्या दिशेने त्रिरत्न बौद्ध महासंघ आणि नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने उचललेले पाऊल म्हणजे, कामठी रोडवरील नागलोक येथील बुद्धसूर्य विहार. आपल्या अल्प काळातच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धम्म ज्ञानाचे हे विहार केंद्र ठरले आहे. शिवाय, भारतातील बुद्ध लेण्यांना आधुनिक स्वरूप देऊन निर्माण केलेली ही वास्तू आहे. येथे मैत्रेय बुद्धाची आकर्षक मूर्ती स्थापित आहे. ४०० धम्म बांधव एकत्र बसून प्रशिक्षण घेतील एवढे प्रशस्त दालन आहे. परिसरात असलेली ५६ फूट उंचीची तथागत गौतम बुद्ध यांची चलित मूर्ती आणि सभोवतालच्या सौंदर्यीकरणाने या विहाराला एक आकर्षक रूप आले आहे.
बौद्धधम्माच्या व आंबेडकरी विचारांच्या प्रचार व प्रसारासोबतच धम्म प्रशिक्षण केंद्र असावे या विचारातून या बुद्ध विहाराची स्थापना करण्यात आली. त्रिरत्न बौद्ध महासंघ आणि नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्यावतीने कामठी रोड नागलोक परिसरातील बुद्धसूर्य विहाराचे लोकार्पण १२ आॅक्टोबर १९९७ रोजी डॉ. यो सिंग चाऊ यांच्या हस्ते झाले. धम्मचारी लोकमित्र यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेला हा नागलोक परिसर साडेचौदा एकरमध्ये विस्तारलेला आहे. येथील इतर वास्तूंपैकी बुद्ध विहार हे एक आकर्षण आहे. या बुद्ध विहाराचे वैशिष्ट्य म्हणजे, एकाचवेळी ४०० लेक बसू शकतील एवढे प्रशस्त विहार आहे. भारतात आढळून येणाऱ्या ऐतिहासिक बुद्ध लेण्यांना आधुनिक रूप देऊन या बुद्ध विहाराची रचना करण्यात आली आहे. अजंठा बुद्ध लेणीतील मुख्य स्तुपात असलेल्या मैत्रेय बुद्ध मूर्तीची प्रतिकृती येथे स्थापन करण्यात आली आहे. मैत्रेय बुद्धाचे हे रूप धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत आहे. अमेरिकेचे जगप्रसिद्ध वास्तुशिल्पकार ख्रिस्टोफर बेनिन्जर यांनी या विहाराची रचना केली आहे. प्रसिद्ध मूर्तिकार शरद कापूसकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती तयार केली आहे. ब्रान्झ धातूची असलेली ही मूर्ती १२ फूट उंच आहे.
‘आयनेब’ धम्म परिषद
या विहारामध्ये ‘आयनेब’ सारख्या अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धम्म परिषदा आयोजित केल्या जातात. देशभरातील बौद्ध तरुण-तरुणींसाठी निवासी धम्म प्रशिक्षण चालविले जाते, तसेच प्रत्येक रविवारी येथे धम्म वर्ग आयोजित केले जातात. तसेच नियमित धम्म शिबिरांचे व धम्म प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते.
दलाई लामा यांचा धम्मोपदेश
या विहारात बौद्ध धम्मगुरू दलाई लामा, व्हिएतनामचे धर्मगुरू थिक-न्हात-हान अशा बौद्ध विद्वानांनी धम्मोपदेश दिलेला आहे. यामुळे या बुद्ध विहाराला वेगळे महत्त्व आले असून एक आदर्श बुद्ध विहार म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
पितळेची ५६ फूट उंच मूर्ती
नागलोक परिसरात विहाराच्या अगदी समोर ५६ फूट उंचीची बुद्धाची चलित मूर्ती हे येथील आकर्षण आहे. विशेष म्हणजे, १५ हजार किलोची ही मूर्ती संपूर्ण पितळेची आहे. ही मूर्ती चीनमध्ये तयार झाली आहे. या बुद्ध मूर्तीच्या अगदी समोर बुद्धसूर्य विहाराच्या उजव्या बाजूला बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे.
धम्म कार्यात यांची होत आहे मदत
या विहारामधून सुरू असलेले धम्मकार्य धम्मचारी लोकमित्र यांच्या नेतृत्वात धम्मचारी विवेकरत्न, धम्मचारी नागमित्र, धम्मचारी सूवीर्य, धम्मचारी पद्मवीर, धम्मचारी प्रज्ञारत्न, धम्मचारी शीलवर्धन, धम्मचारिणी नीत्यश्री, धम्मचारी असंगवज्र व धम्मचारी नागदीप यांचे सहकार्य मिळत आहे.