बुद्धिझम हा जगण्याचा विचार; गगन मलिक यांची ड्रॅगन पॅलेसला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 09:49 PM2022-04-06T21:49:48+5:302022-04-06T21:53:20+5:30
Nagpur News प्रसिद्ध चित्रपट अभिनेते गगन मलिक यांनी नागपूरजवळच्या ड्रॅगन पॅलेसला भेट दिली.
नागपूर, : ' जीवन दु:ख आहे. धम्म या दु:खातून निवारण्याचा मार्ग आहे. बुद्धिझम जगण्याचा विचार आहे. त्यामुळे बुद्धिझमचा प्रचार प्रसार करून एक चांगला समाज व व्यक्ती घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठीच धम्मदेसनातून चांगले विचार पसरविण्याचे काम सुरू असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व चिवर परिधान केल्यानंतर भंते झालेले श्रमण अशोक ऊर्फ गगन मलिक यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केले.
दूरचित्रवाहिनीत प्रभू श्रीराम आणि त्यानंतर दि बुद्धा चित्रपटात तथागत गौतम बुद्धांची भूमिका साकारल्यानंतर मलिक यांना बुद्धिझम व त्याचे महत्त्व पटले. त्यानंतर त्यांनी धम्माच्या प्रचार प्रसार करण्याचे काम हाती घेतले. थायलंड येथे जाऊन त्यांनी चिवर परिधान करत श्रमण अशोक झाले. काही महिने घालविल्यानंतर ते थायलंडमार्गे भारतात आले आहेत. चैत्यभूमी ते दीक्षाभूमी व पुढे बोधगया असा त्यांचा प्रसाराचा मार्ग आहे. या काळात ठिकठिकाणी धम्मदेसना व व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. याअंतर्गत गगन मलिक फाऊंडेशनतर्फे ७ एप्रिलला दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियममध्ये थायलंड येथील भिक्कूगणांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता धम्मदेसना आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी ते नागपूरला आले होते. त्यांनी यावेळी ड्रॅगन पॅलेसला भेट देऊन तेथे काही काळ व्यतीत केला.
मलिक म्हणाले, थायलंड महासंघाने बुद्धिझमच्या प्रसारासाठी सहकार्याचा हात पुढे केला आहे. भारताला बौद्धमय करण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न आपण साकारण्याचा प्रयत्न करणार आहोत. बौद्धमय म्हणजे धर्मांतरण नसून, एका चांगल्या समाज व व्यक्तिमत्त्वाची निर्मिती करणे हा त्यामागील हेतू आहे. एक मिशन म्हणून हे काम हाती घेण्यात आले. याअंतर्गत ८४ हजार बुद्ध मूर्तींचेही देशभरातील सर्व बुद्धविहारांत वितरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रपरिषदेत थायलंडच्या रॉयल मॉनेस्टीचे कॅप्टन नाटाकट्टी, पी.एस.खोब्रागडे, नितीन गजभिये, प्रकाश कुंभे, विनोद थुल, भीमराव फुसे, नितीन पोहाणे मोनाल थूल आदी उपस्थित होते.