‘बुद्धीस्ट सर्किट’ केवळ घोषणाच, अंमलबजावणी कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 01:13 AM2018-10-14T01:13:52+5:302018-10-14T01:17:58+5:30
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत नागपुरातील बुद्धिस्ट सर्किटची घोषणा करीत दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि शांतिवन चिचोली हे आपसात जोडण्याची घोषणा केली होती. परंतु दोन वर्षे झाली ही तिन्ही स्थळे आपसात अजूनही जुळलेली नाही. त्यामुळे बुद्धिस्ट सर्किट आपसात कधी जुळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत नागपुरातील बुद्धिस्ट सर्किटची घोषणा करीत दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि शांतिवन चिचोली हे आपसात जोडण्याची घोषणा केली होती. परंतु दोन वर्षे झाली ही तिन्ही स्थळे आपसात अजूनही जुळलेली नाही. त्यामुळे बुद्धिस्ट सर्किट आपसात कधी जुळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तथागत गौतम बुद्धांमुळे जगभरातील बौद्धांमध्ये भारताबद्दल विशेष प्रेम आहे. भारतातील बौद्ध स्थळांना ते वर्षभर भेटी देत असतात. त्यामुळे बौद्ध स्थळांना पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केल्यास मोठ्या प्रमाणावर पर्यटक वाढतील आणि त्यातून रोजगार वाढेल, या उद्देशाने केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी देशभरातील ३८ बुद्धिस्ट सर्किटची घोषणा केली. यात नागपुरातील दीक्षाभूमी-ड्रॅगन पॅलेस आणि शांतिवन चिचोली तर अजिंठा-वेरुळ आणि मुंबई चैत्यभूमी असा समावेश आहे. ही घोषणा करताना त्याचा मुख्य उद्देश अ्सा होता की, दीक्षाभूमीला आलेल्या पर्यटकास तेथूनच ड्रॅगन पॅलेस व चिचोलीला जाता यावे, यासाठी कनेक्टिव्हीटी, वाहनांची साधने असावीत. परंतु या दिशेने कुठलीही व्यवस्था दोन वर्षात झाल्याचे दिसून येत नाही. केवळ धम्मदीक्षा सोहळ्याच्या वेळी अतिरिक्त बसेसच्या फेऱ्या चालवल्या जातात. वर्षभर जैसे थे स्थिती असते. शांतिवन चिचोली येथे जाण्यासाठी तर बस सुद्धा नाही. पर्यटकांना आपल्या वाहनाने जावे लागते. थेट चिचोलीपर्यंत बसही जात नाही, अशी अवस्था आहे. तेव्हा विदेशी पर्यटक तर दूरच देशातील पर्यटक ही येणार नाहीत.
सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केली नाराजी
बुद्धिस्ट सर्किटच्या अंमलबजावणी संदर्भात माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्या सुलेखा कुंभारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत दीक्षाभूमी-ड्रॅगन पॅलेस आणि शांतिवन चिचोली आपसात कधी जुळतील असा प्रश्न उपस्थित केला.