बौद्ध अर्थशास्त्र मानव कल्याणाचे विज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:20 AM2017-10-22T01:20:31+5:302017-10-22T01:20:46+5:30
बौद्ध अर्थशास्त्र हे समाजातील प्रत्येक घटकासाठी आणि प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी उपयुक्त आहे. आज जगात बौद्ध अर्थशास्त्राचे विशेष महत्त्व आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बौद्ध अर्थशास्त्र हे समाजातील प्रत्येक घटकासाठी आणि प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी उपयुक्त आहे. आज जगात बौद्ध अर्थशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. आर्थिक विकासामध्ये मानव विकास निर्देशांक महत्त्वाचे मानले जातात. बौद्ध अर्थशास्त्रात मानव विकास केंद्रीभूत आहे. त्यामुळे बौद्ध अर्थशास्त्र हे मानवाच्या कल्याणाचे शास्त्र आहे, असे प्रतिपादन इंजि. कुलदीप रामटेके यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागात ‘बौद्ध अर्थशास्त्र’ या विषयावर कुलदीप रामटेके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर विचारधारा पदव्युत्तर विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे होते. डॉ. धनराज डहाट, डॉ. एस.के. गजभिये, प्रा. शैलेश धोंगडे, प्रा. मंगेश जुनघरे, प्रा. किशोर बिर्ला उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रदीप आगलावे यांनी सांगितले, म्यानमारचे आर्थिक सल्लागार इ.एफ. शुमाकर यांनी १९५५ मध्ये ‘बुद्धिस्ट इकोनॉमिक्स’ ही संकल्पना मांडली. १९६६ मध्ये या विषयावर लेख प्रसिद्ध केला. त्यानंतर बौद्ध अर्थशास्त्राचा सर्वत्र विचार करण्यात आला. भारताचे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते डॉ. अमर्त्य सेन यांनी बुद्धाचे कल्याणकारी अर्थशास्त्र जगासमोर मांडले.
संचालन डॉ. रमेश शंभरकर यांनी केले. डॉ. सरोज डांगे-शामकुवर यांनी आभार मानले.