फुटाळा परिसरात साकारणार बुद्धिस्ट थीम पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 09:33 PM2020-09-12T21:33:28+5:302020-09-12T21:34:46+5:30
शहरातील नागरिकांचे आकर्षण असलेल्या फुटाळा तलाव परिसरात बुद्धिस्ट थीम पार्क प्रकल्प साकारला जाणार आहे. यावर एक हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. गुरुवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नागरिकांचे आकर्षण असलेल्या फुटाळा तलाव परिसरात बुद्धिस्ट थीम पार्क प्रकल्प साकारला जाणार आहे. यावर एक हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. गुरुवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.
फुटाळा तलावातील बुद्धिस्ट थीमपार्क येथे ११५ फू ट उंचीची बुद्धमूर्ती, वाचनालय, अभ्यास गृह आदींचा समावेश असलेला भव्य सेंट्रल प्लाझा, साडेतीन हजार व्यक्तीसाठी खुले सभागृह, तसेच मनोरंजनाच्या सोयी प्रस्तावित आहेत. त्रिशताब्दी महोत्सवांतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. प्रकल्पाचे मुख्य आकर्षण म्हणजे ११५ फूट उंचीची बुद्ध मूर्ती २ हजार २९० चौरस मीटर जागेवर उभारली जाणार आहे. तलाव काठावर भ्रमंतीसाठी प्रोमनेड, तलाव काठावर बसण्यासाठी पायऱ्या, नौका विहारासाठी जेटी उभारण्यात येईल. त्याखेरीज येथे आर्ट अॅन्ड क्राफ्ट व्हिलेज, ४२ हजार ४००चौ.मी. क्षेत्रात भव्य सेंट्रल प्लाझा सभागृह, वाचनालय, अभ्यासगृह, प्रदर्शन हॉल, उद्याने, खेळण्यासाठी जागा, शिल्प उद्यान, साडेतीन हजार आसन क्षमतेचे खुले सभागृह, बहुद्देशीय भव्य ध्यानधारणा सभागृह, बुद्धविहार, गौतम बुद्धांच्या आयुष्यातील प्रसंगावर आधारित भित्तीशिल्पे, भिंत्तीचित्रे यामुळे हे थीमपार्क प्रेक्षणीय होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या शिल्पाकडे जागतिक बौद्ध धर्मीय राष्ट्र आकर्षित होतील, पर्यटक येतील. यामुळे नागपूर पर्यटनाचे जागतिक केंद्र होईल. असा विश्वास नितीन राऊत यांनी व्यक्त केला.
अभ्यासक व पर्यटकांसाठी येथे हॉटेल उभारले जाईल. व्याख्यानासाठी सभागृह, राहण्यासाठी ३५ खोल्या असतील. या जमिनीची मालकी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाकडे असून ती संपादित करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे. हा प्रकल्प नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून राबविला जाणार आहे.