जपान व भारतातील बौद्धांनी एकत्र यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 01:30 AM2017-09-30T01:30:06+5:302017-09-30T01:30:40+5:30
जपान आणि भारतातील बौद्धांनी एकमेकांशी संपर्क वाढवावा, एकत्र यावे, एकजूट व्हावे, असे भावनिक आवाहन जपानमधील टोकिया विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. तस्सोसी नेमोतो यांनी शुक्रवारी दीक्षाभूमीवरून केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जपान आणि भारतातील बौद्धांनी एकमेकांशी संपर्क वाढवावा, एकत्र यावे, एकजूट व्हावे, असे भावनिक आवाहन जपानमधील टोकिया विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. तस्सोसी नेमोतो यांनी शुक्रवारी दीक्षाभूमीवरून केले.
६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने शुक्रवारी दीक्षाभूमीवर जागतिक धम्मपरिषद आयोजित करण्यात आली होती. स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई अध्यक्षस्थानी होते. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी या परिषदेचे उद्घाटन केले.
भिक्खू अश्वघोष, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, एन.आर. सुटे, प्राचार्य पी.सी. पवार, प्रा. मेमोरो आदी व्यासपीठावर होते.
डॉ. नेमोतो म्हणाले, शिक्षण हे एक असे माध्यम आहे ज्यामुळे आपले जीवन जीवनात यशस्वी होतो. एक उंची गाठू शकतो. बदल घडवून आणू शकतो. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा शिकण्याचा मंत्र दिला आहे. तेव्हा खूप शिका, आपल्या मुलाबाळांना शिकवा, असे आवाहन त्यांनी केले.
भिक्खू अश्वघोष यांनी देशभरातील बौद्धांच्या एकजुटीवर भर दिला. एस.के. गजभिये यांनी संचालन केले. यावेळी स्मारक समितीचे सदस्य डॉ. सुधीर फुलझेले, अॅड. आनंद फुलझेले, प्रा. देवीदास घोडेस्वार, गौतम अंबादे आदी उपस्थित होते.
जपानच्या विद्यार्थ्यांना बाबासाहेब सांगणारे प्राध्यापक
डॉ. तस्सोसी नेमोतो हे जपानमधील टोकियो विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक आहेत. ते समाजविज्ञान शिकवतात. परंतु मागील काही वर्षांपासून ते जपानमधील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरही समजवून सांगत आहेत. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जपानच्या लोकांपर्यंत पोहोचले. त्यांच्याबद्दल असलेल्या आकर्षणातून डॉ. नेमोतो हे भारतात त्यातही नागपुरात आले. त्यांनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केला. तेव्हापासून ते सातत्याने दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी स्वत: आत्मसात केले असून आता ते जपानच्या विद्यार्थ्यांनाही बाबासाहेब समजवून सांगतात.