अर्थसंकल्प-२०१९ : नागपुरात ‘एम्स’, ‘मेट्रो’सह ‘हाऊसिंग’ला मिळणार ‘बूस्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 11:56 PM2019-07-05T23:56:20+5:302019-07-05T23:57:40+5:30
केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध तरतुदींमुळे उपराजधानीच्या विकास ‘एक्स्प्रेस’चा वेग आणखी वाढणार आहे. अर्थसंकल्पातील घोषणा व विविध योजनांसाठी केलेल्या तरतुदींमुळे ‘एम्स’च्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय ‘मेट्रो’च्या बांधकामालादेखील गती येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरातील ‘हाऊसिंग’ क्षेत्राला नवीन उभारी मिळण्याची आशा वर्तविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध तरतुदींमुळे उपराजधानीच्या विकास ‘एक्स्प्रेस’चा वेग आणखी वाढणार आहे. अर्थसंकल्पातील घोषणा व विविध योजनांसाठी केलेल्या तरतुदींमुळे ‘एम्स’च्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय ‘मेट्रो’च्या बांधकामालादेखील गती येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरातील ‘हाऊसिंग’ क्षेत्राला नवीन उभारी मिळण्याची आशा वर्तविण्यात येत आहे.
मागील काही वर्षांपासून वैद्यकीय हब म्हणून नागपूरची देशभरात ओळख निर्माण झाली आहे. शहरात ‘एम्स’ आल्यानंतर तर आणखी अपेक्षा वाढल्या आहेत. मिहानमधील २०० एकर परिसरात ‘एम्स’चे बांधकाम होत आहे. स्वत:ची इमारत नसल्याने ‘एम्स’ एमबीबीएसचे वर्ग मेडिकल कॉलेजमध्ये सप्टेंबर २०१८ पासून सुरू झाले. पहिले वर्ष व अपुऱ्या जागेमुळे एमबीबीएसच्या ५० जागेवरच प्रवेश देण्यात आले. मात्र २०१९-२० या वर्षात ‘एम्स’च्या आणखी ५० जागा वाढविण्यात येणार आहे. देशभरातील १४ ‘एम्स’मधील हजार जागा वाढणार आहेत. यात नागपूर व गुंटूर येथील प्रत्येकी ५० जागांचा समावेश आहे.
याशिवाय अर्थसंकल्पात विविध ‘मेट्रो’ योजनांसाठी १९ हजार १५२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर ‘मेट्रो’चे काम सुरू असून या तरतुदीमुळे नागपूर मेट्रोच्या कामाला आणखी गती मिळण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे देशभरातील ‘मेट्रो’च्या जाळ्याचा विस्तार करण्यावर सरकारचा भर आहे.
‘हाऊसिंग’मधील मंदी हटणार
मागील काही काळापासून उपराजधानीतील बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण होते. शहरातील अनेक फ्लॅट्स व ‘स्कीम्स’ तयार होऊनदेखील रिकामे आहेत. मात्र केंद्र शासनाने अर्थसंकल्पात घरासंदर्भात केलेल्या घोषणेमुळे हे चित्र बदलेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अर्थंसंकल्पातील तरतुदी व घोषणेनुसार घरखरेदी स्वस्त होणार आहे. सध्या गृह कर्जावर २ लाखांची सवलत मिळते. या सवलतीत आता दीड लाखांची भर पडणार आहे. ४५ लाखांपर्यंत घर खरेदीवर व्याजामध्ये साडेतीन लाखांची सूट मिळणार आहे. यामुळे शहरातील रिकाम्या फ्लॅट्सला खरेदी करण्यासाठी लोक समोर येतील, अशी अपेक्षा गृहनिर्माण क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.