Budget 2020 : -तर आयकरच्या जुन्या प्रणालीत परत येणे अशक्य : सीए कैलास जोगानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:52 PM2020-02-11T23:52:37+5:302020-02-11T23:53:35+5:30
करदाते एकदा या नवीन करप्रणालीत आले तर त्यांना पुन्हा जुन्या करप्रणालीत परत जाता येणार नाही, अशी माहिती सीए कैलास जोगानी यांनी येथे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अर्थसंकल्पात वैयक्तिक करदाते आणि एचयूएफकरिता आयकरचे नवीन कलम ११५ बीएसीअंतर्गत नवीन आयकर स्लॅब दिल्या आहेत. त्यात कराचे दर कमी आहेत, परंतु त्यातील सर्वच वजावटी हटविण्यात आल्या आहेत. करदाते एकदा या नवीन करप्रणालीत आले तर त्यांना पुन्हा जुन्या करप्रणालीत परत जाता येणार नाही, अशी माहिती सीए कैलास जोगानी यांनी येथे दिली.
नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) माजी अध्यक्ष सीए कैलास जोगानी यांनी अर्थसंकल्पीय विश्लेषण केले. यावेळी चेंबरचे अध्यक्ष विष्णूकुमार पचेरीवाला होते. जोगानी म्हणाले, नवीन प्रणालीचे फायदे आणि नुकसानही आहेत. आता कंपन्यांवर लाभांश वितरण कर लागणार नाही. भागीदारी फर्म वा कंपनीच्या कराच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. ऑडिटची मर्यादा ५ कोटींवर नेताना वित्तमंत्र्यांनी ५ टक्क्यांपेक्षा जास्त रोखीची प्राप्ती तसेच ५ टक्क्यांपेक्षा जास्त रोखीने व्यवहार असू नये, अशी अट टाकली आहे. आता कंपनीने करदाते तसेच ऑडिटअंतर्गत येणाऱ्या करदात्यांची रिटर्न फायलिंगची तारीख ३० सप्टेंबरहून वाढवून ३१ ऑक्टोबर केली आहे. पण टॅक्स ऑडिट अहवाल ऑनलाईन फाईल करण्याची तारीख यथावत ३० सप्टेंबर राहणार असल्याचे जोगानी यांनी सांगितले. आता सर्व जुन्या आणि नवीन चॅरिटेबल व अन्य संस्थांना ऑनलाईन नव्याने नोंदणी करावी लागणार आहे.
जीएसटीमध्ये झालेल्या बदलांची माहिती देताना सीए रितेश मेहता म्हणाले, कम्पोझिशन स्कीम, नोंदणी, इनपूट टॅक्स क्रेडिट इत्यादीच्या तरतुदीत बदल केल्याने व्यापाऱ्यांचा फायदा होणार आहे.
संचालन चेंबरचे सहसचिव तरुण निर्बाण यांनी तर विवेक मुरारका यांनी आभार मानले. यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष गोविंद पसारी, माजी अध्यक्ष महेंद्र कटारिया, भागीरथ मुरारका, कमलेश शाह, कोषाध्यक्ष वेणुगोपाल अग्रवाल, संचालक विजय जयस्वाल, विपीन पनपालिया, पुरुषोत्तम ठाकरे, देवकीनंदन खंडेलवाल, जवाहरलाल चुग, सुदर्शन मदान, ओमप्रकाश अग्रवाल, साजनकुमार गोयल आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.