अर्थसंकल्प पुन्हा लांबणीवर! मनपाचा आता १५ ऑगस्टचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 11:18 PM2020-08-04T23:18:51+5:302020-08-04T23:20:10+5:30
महापालिकेचा २०२०- २१ या वर्षाचा अर्थसंकल्प ३१ जुलैपूर्वी सादर करण्याचा मानस स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी व्यक्त केला होता. परंतु मनपाच्या विविध विभागाकडून नियोजन प्राप्त न झाल्याने अर्थसंकल्प लांबणीवर पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेचा २०२०- २१ या वर्षाचा अर्थसंकल्प ३१ जुलैपूर्वी सादर करण्याचा मानस स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी व्यक्त केला होता. परंतु मनपाच्या विविध विभागाकडून नियोजन प्राप्त न झाल्याने अर्थसंकल्प लांबणीवर पडला आहे.
झोन कार्यालय व संबंधित विभागांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही नियोजन प्राप्त झाले नाही. प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने जुलै महिन्यात अर्थसंकल्प सादर करता आला नाही. मात्र १५ आॅगस्टपर्यंत पुढील वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल, अशी माहिती पिंटू झलके यांनी दिली.
जूनमध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा
स्थायी समिती अध्यक्षाकडून साधारणपणे जून महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा आहे. शहरातील विकास कामांना गती मिळावी. या हेतूने एप्रिल महिन्यातच अर्थसंकल्प सादर करण्याचा पिंटू झलके यांचा मानस होता. परंतु प्रशासनाचे सहकार्य न मिळाल्याने जुलै महिन्यातही अर्थसंकल्प सादर करता आला नाही.
कोरोनाचाही फटका
कोविड -१९ मुळे लॉकडाऊन कालावधीत कार्यालयीन कामकाज जवळपास ठप्पच होते. मनपाची यंत्रणा कोरोना नियंत्रणा व्यस्त झाली. यामुळे नियोजन कोलमडले. त्यात वित्त विभाग व झोन कार्यालयाकडून खर्चाचे विवरण वेळेवर प्राप्त झाले नाही. अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर विभाग प्रमुख कामाला लागले.
शासन अनुदानही घटले
गेल्या वर्षी तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी ३१९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. आयुक्तांनी या अर्थसंकल्पाला कात्री लावत सुधारित अर्थसंकल्प २६९८ कोटीवर आणला. तर २०२०-२१ या वर्षाचा २५४७ कोटींचा प्रस्तावित अर्थसकल्प स्थायी समितीकडे सादर केला. राज्य सरकारने जीएसटी अनुदानात दर महिन्याला केलेली ४० कोटींची कपात व विशेष अनुदान प्राप्त होण्याची शक्यता नसल्याने स्थायी समिती अध्यक्ष आयुक्तांच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात किती वाढ करतात, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.