शेतकऱ्यांसह दुर्बल घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : ऊर्जामंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 07:11 PM2019-06-18T19:11:57+5:302019-06-18T19:13:16+5:30
राज्यातील शेतकऱ्याला समृद्ध करणे व ग्रामीण भागात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देणारा, ओबीसी मुला-मुलींना सवलत तसेच पाचवी ते दहावीतील मागास मुलींना शिष्यावृत्ती योजना जाहीर करून शैक्षणिक विकास साधणारा व दुर्बल घटकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केल्याची प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील शेतकऱ्याला समृद्ध करणे व ग्रामीण भागात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देणारा, ओबीसी मुला-मुलींना सवलत तसेच पाचवी ते दहावीतील मागास मुलींना शिष्यावृत्ती योजना जाहीर करून शैक्षणिक विकास साधणारा व दुर्बल घटकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केल्याची प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
विधिमंडळात मंगळवारी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सन २०१९-२० चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, ऊर्जा विभाग अधिक मजबूत करून शेतकऱ्यांना पूर्णदाबाने वीज पुरवठा करता यावा म्हणून विदर्भ-मराठवाड्यातील प्रलंबित कृषी पंपांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे कनेक्शन देण्यासाठी लागणारा १९५४ कोटी रुपये अर्थसंकल्पातून महावितरणला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात ही योजना राबवण्यासाठी २५४२ कोटीचा निधी खुल्या बाजारातून उभारण्यास शासनाने या अर्थसंकल्पातून मंजुरी दिली आहे.
भारनियमनमुक्त असलेल्या महाराष्ट्रात विजेचे प्रमाण मुबलक आहे. मात्र भविष्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन १३२० मेगावॅटच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाला लागणाऱ्या ८ हजार ४०७ कोटींना अर्थमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली. यामुळे राज्यात भविष्यात विजेची टंचाई जाणवणार नाही.
वृद्ध, निराधार, दिव्यांग, विधवा या समाजातील दुर्बल घटकांना या अर्थसंकल्पातून मदतीचा हात अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिला आहे. दुर्बल घटकांचे जीवन सुसह्य व्हावे म्हणून संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजनांमार्फत मिळणाऱ्या ६०० रुपये अर्थसाहाय्यावरून १०० रुपये वाढ करण्यात आली आहे. कोणतीही करवाढ न सुचवणारा व समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असून, आपण या अर्थसंकल्पाचे स्वागत करीत असल्याचे बावनकुळे म्हणाले.