रामटेक पालिकेचा अर्थसंकल्प ३६.१० काेटीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:12 AM2021-02-28T04:12:44+5:302021-02-28T04:12:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : नगरपालिकेची अर्थसंकल्पीय विशेष सभा शुक्रवारी (दि. २६) दुपारी पालिकेच्या सभागृहात पार पडली. एकूण १९ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : नगरपालिकेची अर्थसंकल्पीय विशेष सभा शुक्रवारी (दि. २६) दुपारी पालिकेच्या सभागृहात पार पडली. एकूण १९ पैकी १८ नगरसेवकांच्या उपस्थितीत १९.६५ कोटी रुपयाच्या संभाव्य खर्चावर चर्चा करण्यात आली. शिवाय, पालिकेच्या सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ३६.१० काेटी रुपयाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.
नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या विशेष सभेत नगरपालिकेचा सन २०२०-२१ च्या सुधारित अर्थसंकल्पासाेबत सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पाला एकमताने मंजुरी देण्यात आली. पालिकेचे लेखापाल अमित खंडेलवाल यांनी सन २०२०-२१ च्या सुधारित अर्थसंकल्पामध्ये या आर्थिक वर्षातील गत आठ महिन्यातील सर्व विभागीय खर्चाचा आढावा घेत, आगामी चार महिन्यातील १९.६५ कोटी रुपयाच्या संभाव्य खर्चाचे अंदाजपत्रक मांडले. या संभावित खर्चाला सभागृहात चर्चेअंती मंजुरी देण्यात आली.
शिवाय, सन २०२१-२२ चा ३६.१० काेटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यावरही विस्तृत चर्चा करण्यात आली. या अर्थसंकल्पात स्थानिक विकास कामांना प्राधान्य देण्यात आल्याचेही सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान आवास योजनेसाठी १५० लाख, वैशिष्ट्यपूर्ण निधीसाठी तीन काेटी, विशेष रस्ता निधीसाठी १.५० कोटी, नगरोत्थान महाअभियनासाठी सात कोटी तसेच रमाई आवास योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचे सभागृहात सांगण्यात आले.
या सभेला पालिकेचे उपाध्यक्ष आलोक मानकर, नगरसेवक प्रवीण मानापुरे, प्रभाकर खेडकर, संजय बिसमोगरे, दामोदर धोपटे, सुमित कोठारी, विवेक तोतडे, चित्रा धुरई, अनिता टेटवार, लता कामळ, पद्मा ठेंगरे, रत्नमाला अहिरकर, शिल्पा रणदिवे, सुलेखा माकडे, उज्ज्वला धमगाये, वनमाला चौरागडे या नगरसेवकांसह प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे, गणेश अंदुरे व पालिकेतील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.