बजेट मंजूर झाले पण कामे बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:26 AM2020-12-16T04:26:09+5:302020-12-16T04:26:09+5:30
कार्यादेश झालेली कामे सुरू करण्याची विरोधकांची मागणी : आयुक्तांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कर्मचाऱ्यांना सातवा वेतन ...
कार्यादेश झालेली कामे सुरू करण्याची विरोधकांची मागणी : आयुक्तांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यासाठी २५० कोटी तर कंत्राटदारांची जुनी देणी देण्यासाठी ४०० कोटींची गरज आहे. दुसरीकडे मनपा तिजोरीत पैसा नाही. याचा विचार करता उपलब्ध निधीनुसार विकास कामांचे कार्यादेश दिले जातील. फेब्रुवारीत सादर होणाऱ्या सुधारित अर्थसंकल्पात नवीन कामासांठी तरतूद करण्याचे संकेत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले. यातून बजेट मंजूर असले तरी त्याची अंमलबजावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असेल तर सत्तापक्षाची यातून चांगलीच कोंडी होणार आहे..
कोविडमुळे प्रभागातील विकास कामे ठप्प आहेत. गेल्या वर्षी कार्यादेश झालेली कामेही सुरू झालेली नाही. कार्यादेश झालेली कामे सुरू करावी, अशी मागणी मंगळवारी मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राधाकृष्णन बी. यांना दिलेल्या निवेदनातून केली. प्रभागातील चेंबर, रस्ते, गडर लाईन यासाखी आवश्यक कामे ठप्प असल्याचे वनवे यांनी निदर्शनास आणले. निधी उपलब्धतेनुसार विकास कामांचे कार्यादेश दिले जातील, असे आवश्वासन आयुक्तांनी दिले.
शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, जुल्फेकार अहमद भुट्टो, दिनेश यादव, हर्षला साबळे, किशोर जिचकार, जिशान मुमताज, आयेशा उईके, कमलेश चौधरी, परसराम मानवटकर, प्रणिता शहाणे ,माजी नगरसेवक मनोज साबळे आदींचा समावेश होता.