बग्गा खुनातील सेंगरचा जामीन फेटाळला
By admin | Published: May 11, 2017 02:47 AM2017-05-11T02:47:16+5:302017-05-11T02:47:16+5:30
अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात नीलेश ऊर्फ बग्गा विठ्ठल कौरती याच्या खून प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात नीलेश ऊर्फ बग्गा विठ्ठल कौरती याच्या खून प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्या न्यायालयाने मरारटोली येथील रहिवासी आरोपी नरेंद्रसिंग ऊर्फ बबल्या दिवाकर सेंगर (३०) याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
१६ डिसेंबर २०१६ रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास फिर्यादी अजय भाऊराव मेश्राम हा बग्गासोबत फुटाळा तलावाचा फेरफटका मारण्यासाठी गेला होता. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ते आपल्या घराकडे परत आले होते. बग्गा हा आपल्या घरासमोर थांबून अजयसोबत बोलत असताना बग्गाला बबल्या सेंगर याचा फोन आला होता. माझ्या आईला ‘हार्ट अटॅक’ आला आहे, तू माझ्या घरी ये, असे बबल्याने म्हटले होते. दोघेही बबल्याच्या घराकडे जात असताना मरारटोली माता मंदिरनजीकच्या प्रशांत ज्वेलर्ससमोर मुकुंद खंडाते, राहुल ऊर्फ टेमर खंडाते, प्रणय कावळे आणि बाल्या सेंगर सर्व रा. तेलंगखेडी मरारटोली यांनी बग्गावर हल्ला केला होता. यावेळी अजय मेश्राम पळून गेला होता. बग्गाला नजीकच्या खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले होते. मुकुंद खंडाते आणि बग्गा यांच्यात जुने वैमनस्य होते. त्यातून हा खून करण्यात आला होता.
आरोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर सेंगर याने जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपी जामिनावर बाहेर येताच साक्षीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याने न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.