जाणीवपूर्वक देशविरोधी वातावरण तयार करणाऱ्यांविरुद्ध जनआंदोलन उभारा - उपराष्ट्रपती जगदीप धनखड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 10:28 AM2023-08-05T10:28:44+5:302023-08-05T10:29:22+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव
नागपूर : ‘२०४७ पर्यंत भारत जगातील पहिली मोठी अर्थव्यवस्था असणारा देश व्हावा, या दिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र, जगात काही लोक हे जाणीवपूर्वक भारतविराेधी वातावरण (ॲन्टी इंडिया नॅरेटिव्ह) तयार करत आहेत. तेव्हा नागरिकांनी अशा लोकांविरुद्ध जनआंदोलन उभारावे,’ असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस होते. उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष अतिथी होते. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे व्यासपीठावर उपस्थित होते.
उपराष्ट्रपती म्हणाले, ‘लोकसभा व राज्यसभा ही लोकशाहीची मंदिरे आहेत. परंतु, लोकशाहीलाच तिलांजली देण्याचे काम सुरू आहे. देशभरातील लोकप्रतिनिधी हे संसदेत निवडून येतात. त्यामुळे येथे लोकांच्या विषयावर चर्चा, संवाद होणे अपेक्षित आहेत. परंतु, तेच होताचा दिसून येत नाही.’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विद्यापीठाच्या गौरवाशाली इतिहासावर प्रकाश टाकला. यावेळी विद्यापीठाच्या ‘शतदीपपूर्ती’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी स्वागतपर भाषण केले.
नवीन शैक्षणिक धोरण उद्यमशील व सर्जनशील - राज्यपाल बैस
राज्यपाल रमेश बैस म्हणाले, ब्रिटिशांचे शैक्षणिक धोरण हे केवळ नोकर करण्यापुरते होते. परंतु, देशाचे पहिल्यांदाच उद्योजकता, नाविन्य, संशोधन, सर्जनशील विचार आणि क्रिटिकल थिंकिंगवर भर देणारे शैक्षणिक धोरण आणले गेले आहे. यावेळी जैवतंत्रज्ञान विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. एच. एफ. दगिनवाला, ‘हल्दीराम’ समूहाचे संस्थापक अध्यक्ष शिवकिशन अग्रवाल, ‘यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा’चे अध्यक्ष, प्राध्यापक सुरेश देशमुख, ‘संपूर्ण बांबू केंद्र’च्या अध्यक्ष डॉ. निरूपमा देशपांडे आणि साहित्य व कला यासाठी हरिश्चंद्र बोरकर यांना ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार’ जाहीर करत त्यांचे अभिनंदन केले.
विद्यापीठ गीताविनाच शताब्दी महोत्सव
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे , दे वरचि असा दे... राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे हे भजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यापीठ गीत आहे. विद्यापीठाचा प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात या गीतानेच होते. परंतु शताब्दी महोत्सव समारंभ विद्यापीठ गीताविनाच पार पडला. उपराष्ट्रपती कार्यालयाकडे कार्यक्रमात एकूण तीन गीतांची यादी पाठवण्यात आली होती. त्यात राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलनुसार विद्यापीठ गीत कार्यक्रमातून वगळण्यात आल्याचे सांगितले जाते.