भुकेल्या वानरांसाठी ‘सेतू’ बांधा रे ‘सागरी...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:15 AM2020-11-19T11:15:52+5:302020-11-19T11:16:18+5:30
Nagpur News monkey गोसेखुर्द प्रकल्पाच्या ‘बॅक वॉटर’मध्ये गत १० दिवसापासून अडकलेल्या भुकेलेल्या वानरांसाठी ‘सेतू’ कोण बांधणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
अभिमन खराबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपू : प्रभू श्रीरामचंद्रांना लंकेत पोहोचविण्यासाठी वानरसेनेने सेतू उभारला होता. या सेतूच्या बळावरच राम लंकेत पोहोचले आणि रावणाचा अंत केला. त्रेतायुगातील या सेतूचा आजच्या कलयुगातही दाखला दिला जातो. मात्र नागपूर जिल्ह्यातील सिर्सी (ता. कुही) येथे गोसेखुर्द प्रकल्पाच्या ‘बॅक वॉटर’मध्ये गत १० दिवसापासून अडकलेल्या भुकेलेल्या वानरांसाठी ‘सेतू’ कोण बांधणार, असा प्रश्न विचारला जात आहे. गोसेखुर्दच्या ‘बॅक वॉटर’मुळे सिर्सी गावाचा संपूर्ण परिसर पाण्याखाली आला आहे.
पाण्यात आलेल्या झाडावर अंदाजे १५० हून अधिक माकडे (वानर) अडकली आहेत. सभोवताल पाणी असल्याने तसेच माकडांना पोहता येत नसल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य होत नाही. १० दिवसापासून झाडावरच मुक्कामी असलेल्या या माकडांना ‘रेस्क्यू’करून वाचविणे गरजेचे आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे ‘बॅक वॉटर’ कमी-अधिक होत असते.
पाण्याची पातळी कमी होताच शिंगाड्यांंच्या वेलींचा आधार घेत काही माकड झाडावर गेली. त्यातच पाण्याची पातळी वाढल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी भूक शमविण्यासाठी सुरुवातीला झाडाची पाने खायला सुरुवात केली. १० दिवसात झाडाची संपूर्ण पाने खाऊन संपल्याने त्या माकडांनी आता झाडाची साल ओरबाडून खायला सुरुवात केली आहे.
‘रेस्क्यू ऑपरेशन’ होणार का?
ही बाब लक्षात येताच परिसरातील शिवशंकर गेडेकर, विवेक भुडे, लोकेश चौधरी, मंगेश शेंडे, स्वप्निल करुडकर, वृषभ रोहणकर, रजत तिरपुडे, कुणाल पाटील, आकाश पोहनकर, विकास दिघोरे, राकेश कळंबे, अनिल डहारे यांनी त्या माकडांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना यश न आल्याने त्यांनी या माकडांबाबत तीन दिवसापूर्वी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. परंतु वन कर्मचाऱ्यांनी त्या माकडांना अद्यापही पाण्याबाहेर काढले नाही, अशी माहिती या तरुणांसह नागरिकांनी दिली. त्यांना वाचविण्यासाठी वन विभागाने ‘रेस्क्यू ऑपरेशन’ करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.