कुजबा शिवारातील आमनदीवर पुलाचे बांधकाम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:07 AM2021-07-01T04:07:06+5:302021-07-01T04:07:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : ‘धरण अन् गाेरगरिबांचे मरण’ याचे जिवंत उदाहरण म्हणजे गाेसेखुर्द प्रकल्प म्हणता येईल. कारण या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
वेलतूर : ‘धरण अन् गाेरगरिबांचे मरण’ याचे जिवंत उदाहरण म्हणजे गाेसेखुर्द प्रकल्प म्हणता येईल. कारण या प्रकल्पामुळे कुही तालुक्यांतील कुजबावासीयांना अनेक यातना भाेगाव्या लागत आहेत. गावालगतच्या नदी-नाल्यांमध्ये धरणाचे पाणी दुथडी भरून वाहते. परिणामी, शेतीची वहिवाट बंद हाेते. नदी-नाल्याने वेढलेल्या शेतीच्या रस्त्यावर पाणी आल्याने शेती कसण्याची समस्या उभी ठाकली आहे. त्यामुळे या शिवारातील आमनदीवर पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
एका बाजूला आमनदी, तर दुसऱ्या बाजूने रुंद पात्र असलेला नालावजा लहान नदीच्या वेढ्याने कुजबा येथील जवळपास २० शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अडकल्या आहेत. शेतीची वहिवाट व रहदारीसाठी जीव धाेक्यात घालावा लागताे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंदाजे ४९ हेक्टर शेतजमिनीसाठी शासनाने मजबूत बंधाऱ्याचे बांधकाम करावे किंवा सुधारित भूसंपादन कायद्यानुसार शेतजमिनी संपादित कराव्या, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे. याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून स्थानिक लाेकप्रतिनिधींनी आमची समस्या साेडवावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
या संदर्भात गावकऱ्यांनी अनेकदा निवेदने देऊन समस्या मांडली. विशेषत: नदी-नाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वेढल्या आहेत, तेथे मागील वर्षापर्यंत शेतीत नियमित ये-जा करण्यासाठी व शेतमाल ने-आण करण्यासाठी एका सुरक्षित नावेचा उपयाेग हाेत हाेता. परंतु, दिवसेंदिवस पाण्याच्या पातळीत हाेणारी वाढ पाहता यंदा नाविकाने ने-आण करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या २० कुटुंबांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने पुढील उपाययाेजना हाेईस्ताेवर नावेची साेय करून देण्याची मागणी हाेत असून, आता तरी लाेकप्रतिनिधींनी आमच्या समस्येकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी कुजबा येथील शेतकरी करीत आहेत.
....
कुजबा येथील शेतकऱ्यांच्या समस्येबाबत माहिती असून, त्यावर ताेडगा काढण्यासाठी लवकरच बैठक बाेलावून समस्या साेडविली जाईल.
- राजू पारवे, आमदार, उमरेड.
...
शासन-प्रशासनाने आमची आर्त हाक ऐकून आम्हाला ये-जा करण्यासाठी आमनदीवर पूल तयार करून द्यावा अन्यथा आमची जमीन संपादित करावी.
- शफी कुरेशी, शेतकरी
खरीप हंगामातील कामे अद्यापही प्रलंबित आहेत. तेव्हा यावर तोडगा काढेपर्यंत शासनाने नावेची सोय करून देत आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न साेडवावा.
- पतिराम कुकडे, शेतकरी