तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आदर्श बाल रुग्णालय तयार करा (विचारार्थ)()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:09 AM2021-05-26T04:09:10+5:302021-05-26T04:09:10+5:30
मनपा प्रशासनाला देवेंद्र फडणवीस यांची सूचना : मनपा मुख्यालयात आढावा बैठक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जागतिक ...
मनपा प्रशासनाला देवेंद्र फडणवीस यांची सूचना : मनपा मुख्यालयात आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिक आरोग्य संघटना आणि तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याची शक्यता अधिक आहे. हे लक्षात घेऊन नागपूर महापालिकेने त्यादृष्टीने तयारी सुरू करावी. एका ठिकाणी २०० बेडची व्यवस्था होईल, असे एक आदर्श बाल रुग्णालय तयार करण्याची सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यासाठी आवश्यक त्या सर्व वस्तूंची पूर्तता नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये सध्या पसरत असलेल्या म्युकरमायकोसिस व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने काय तयारी चालविली आहे, याचा आढावा मंगळवारी मनपा मुख्यालयात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आला. आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., स्थायी समितीचे माजी सभापती विजय झलके, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते.
म्युकरमायकोसिसबद्दल राधाकृष्णन बी. यांनी माहिती दिली. सध्या हा रोग वेगाने वाढतो आहे. एक महिन्यापूर्वी कोविड होऊन गेलेल्या नागरिकांवर स्टेराॅईडच्या अतिवापरामुळे आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये काळी बुरशी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा रुग्णांना विचारणा करून रुग्णांचा शोध, लवकर निदान आणि तातडीने उपचार ही त्रिसूत्री मनपा प्रशासन अंमलात आणत आहे. तिसऱ्या लाटेसाठी तयारीच्या दृष्टीने पाचपावली, के.टी.नगर, इंदिरा गांधी रुग्णालयात किमान १०० बेड्स लहान मुलांसाठी तयार करण्याचे प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले.
निरनिराळ्या ठिकाणी बेड निर्माण करण्यापेक्षा एका ठिकाणी २०० बेडची व्यवस्था लहान मुलांसाठी करता येईल का, त्यासाठी आवश्यक सर्व उपकरणे, वस्तू पुरवू. त्याचे नियोजन द्या. आता वेळ आहे. लवकर त्या वस्तूंचे ऑर्डर दिल्यास पुढील एक ते दीड महिन्यात मनपाचे आदर्श बाल रुग्णालय उभे होऊ शकते. यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच त्यांनी यासाठी लागणारे उपकरण व सर्व आवश्यक वस्तूंची यादी सात दिवसात देण्याची सूचना केली.
...
पोस्ट कोविड सेंटर सुरू करा
म्युकरमायकोसिसवर तातडीने उपचार व्हावेत, लक्षणे दिसताच प्राथमिक उपचार तातडीने मिळावेत, यासाठी विधानसभानिहाय पोस्ट कोविड सेंटर एक आठवड्यात सुरू करा. या केंद्रांमध्ये दातांचे व कान, नाक, गळ्याचे तज्ज्ञ डॉक्टर चाचपणी करतील. यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.