समृद्धी महामार्गाची ओळख जागतिकस्तरावर निर्माण करा

By admin | Published: July 10, 2017 01:48 AM2017-07-10T01:48:06+5:302017-07-10T01:48:06+5:30

राज्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या महत्त्वाकांक्षी नागपूर- मुंबई या समृद्धी महामार्गामुळे केवळ वेळेची बचत होणार नसून राज्यातील २४ जिल्ह्यांना त्याचा लाभ होणार आहे.

Build the identity of the prosperity highway on a global scale | समृद्धी महामार्गाची ओळख जागतिकस्तरावर निर्माण करा

समृद्धी महामार्गाची ओळख जागतिकस्तरावर निर्माण करा

Next

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे बांधकाम परिषद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या महत्त्वाकांक्षी नागपूर- मुंबई या समृद्धी महामार्गामुळे केवळ वेळेची बचत होणार नसून राज्यातील २४ जिल्ह्यांना त्याचा लाभ होणार आहे. समृद्धी महामार्ग व कॉरिडोर तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण तसेच सर्वोत्कृष्ट निर्मितीसाठी अभियांत्रिकी रचनाकारांनी संकल्पना तयार करून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पूल व बोगद्यांच्या निर्मितीसाठी सर्वोत्कृष्ट रचना आणि आकर्षकता संदर्भातील आंतरराष्ट्रीय अभियंता परिषदेचे आयोजन केंद्रीय महामार्ग निर्मिती विभाग, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग व भारतीय राष्ट्रीय पूल व अभियांत्रिकी स्थापत्य अभियंत्यांच्या संघटनांमार्फत करण्यात आले आहे.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संयोजक संघटनेचे अध्यक्ष तथा एनएचएआयचे सदस्य डी. ओ. तावडे, आय. के. पांड्या, तांत्रिक समितीचे अध्यक्ष ए. के. बॅनर्जी, डॉ. वर्षा सुब्बाराव, आर. के. पांडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अजित सगणे व्यासपीठावर उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे बांधकाम परिषदेला जागतिक स्तरावरील तज्ज्ञ तसेच राज्याच्या विविध भागातून सुमारे ४५० प्रतिनिधी उपस्थित आहेत.
राज्याच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गामुळे नागपूरहून मुंबईत केवळ आठ ते दहा तासात पोहोचणे शक्य होणार असून, हा प्रकल्प कृषी व उद्योग व विकासासाठी समृद्धी कॉरिडोर म्हणून विकसित करण्यात येत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील २४ जिल्ह्यांतून जाणारा हा महामार्ग कृषी समृद्धीचा महामार्ग ठरणार आहे. या महामार्गावरून गॅस, पेट्रोल, पेट्रोकेमिकल आदी पाईपलाईन राहणार आहेत तसेच विमान उतरण्याचीसुद्धा सुविधा असणाऱ्या या राज्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे डिझाईन हे जागतिकस्तराचे असावे यासाठी सर्व अभियांत्रिकी वास्तुविशारदांनी पुढाकार घेऊन जगातील अत्यंत सुंदर असे डिझाईन तयार करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन केले.
आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे बांधकाम हा परिसंवाद नव्या भारताच्या निर्मितीला पुढे नेणारा असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाने काश्मीरला जोडणारा बोगदा तसेच ब्रह्मपुत्रेवरील सर्वात मोठा सेतू ही नवी भारताची ओळख पंतप्रधान नरेंद्र मोदी व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अद्वितीय कार्यामुळे झाली आहे.
एनएचएआयचे सदस्य व एआयबीएसईचे अध्यक्ष डी. ओ. तावडे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे बांधकाम परिषदेच्या आयोजनाबाबत सांगताना बांधकामाच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन तसेच नवनिर्मितीमध्ये गुणवत्ता, दर्जा व सौंदर्य यावर विशेष भर देऊन महामार्गाची निर्मिती करताना जगातील पर्यटकांना आकर्षित करणारे पूल व बोगदे तयार करण्यासाठी या परिषदेत विचारमंथन होत असल्याचे सांगितले.
संघटनेचे प्रमुख आय. के. पांडे यांनी आभार मानले. यावेळी महापौर नंदाताई जिचकार, युरोपसह विविध देशातील अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

सी-लिंकमुळे आज मुंबई व राज्याची ओळख
बांधकामाच्या निर्मितीमध्ये आकर्षकता असेल तर ती राज्याची ओळख ठरते. पूर्वी गेट वे आॅफ इंडिया ही मुंबई व राज्याची ओळख होती; आता वरळी-वांद्रे सी-लिंक ही राज्याची व मुंबईची ओळख झाली आहे. मुंबई येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वरळी-वांद्रे सी-लिंकसोबत वांद्रे ते वर्सोवा नवीन सी-लिंक तयार करण्यात येणार आहे. नरिमन पॉर्इंट ते वरळी समुद्री मार्ग, ट्रान्स हार्बर सी-लिंकचे बांधकाम करताना सुरक्षा, सुंदरता व टिकाऊपणा याला प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नितीन गडकरी यांचा गौरव
देशातील रस्ते विकासासोबतच पूल व बोगद्यांच्या कामाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिशा दिली असून, या क्षेत्रातील त्यांच्या कामाचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. तसेच यावेळी अखिल भारतीय अभियांत्रिकी संघटनेतर्फे नितीन गडकरी यांनी अभियांत्रिकी कौशल्याला सुवर्णकाळ मिळवून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार होता. परंतु ते उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे गडकरी यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचे यावेळी वाचन करण्यात आले.

Web Title: Build the identity of the prosperity highway on a global scale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.