पुरातन अम्मा दर्ग्याला सुरक्षाभिंत उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:12 AM2021-08-27T04:12:32+5:302021-08-27T04:12:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : नदीकाठावर मरियम अम्मा दर्गा असून, या दर्ग्याची स्वातंत्र्यकाळापूर्वी सन १९२० मध्ये निर्मिती करण्यात आली. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : नदीकाठावर मरियम अम्मा दर्गा असून, या दर्ग्याची स्वातंत्र्यकाळापूर्वी सन १९२० मध्ये निर्मिती करण्यात आली. या पुरातन दर्ग्याची सुरक्षाभिंत तसेच सिमेंट पायऱ्या मागील वर्षी आलेल्या पुरात वाहून गेल्या. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धाेका निर्माण झाला आहे. याकडे लक्ष वेधत दर्ग्याची सुरक्षाभिंत उभारण्यात यावी, अशी मागणी दर्गा कमिटी व भाविकांनी शासनाकडे केली आहे.
संत बाबा ताजुद्दीन व हजरत मरियम अम्मा दर्गा असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी असलेल्या मरियम अम्मा समाधीस्थळी मोठ्या संख्येत भाविक दर्शनासाठी येतात. परंतु, मागील वर्षी ३० ऑगस्टला कन्हान नदीला आलेल्या पुरात दर्ग्याचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. एक वर्षाचा काळ उलटूनही सुरक्षाभिंत तसेच क्षतिग्रस्त भागाच्या दुरुस्तीचे काम झालेले नाही. त्यावेळी राज्याचे आपत्ती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या ठिकाणी पाहणी करताना लवकरच मदत देण्याचे आश्वासन दिले हाेते. सद्य:स्थितीत सुरक्षाभिंत नसल्याने भूस्खलन हाेण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय, भविष्यात पूर आल्यास बाबा ताजुद्दीन यांचे बैठकस्थान व अम्मा दर्ग्याला मोठ्या प्रमाणात हानी पाेहोचू शकते. त्यामुळे शासन, प्रशासनाने याकडे लक्ष पुरवून दर्ग्याला सुरक्षाभिंत तसेच सिमेंटच्या पायऱ्यांचे बांधकाम करावे, अशी मागणी सज्जादानसीन ताजी तन्वीरुद्दीन यांच्यासह भाविकांनी केली आहे.