घर तिथे सैनिक, गाव तिथे शाखा निर्माण करा
By आनंद डेकाटे | Published: May 6, 2024 06:37 PM2024-05-06T18:37:33+5:302024-05-06T18:39:35+5:30
दीक्षाभूमीवरून समता सैनिक दलाचे आवाहन : राष्ट्रीय संमेलनात देशभरातून प्रतिनिधी सहभागी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात बंधूभाव रूजवणे आणि संविधानिक रिपब्लिकन विचार मजबूत करण्याचा संकल्प समता सैनिक दलाने घेतला आहे. यासाठी घर तिथे सैनिक आणि गाव तिथे शाखा निर्माण करून घराघरातून नवप्रशिक्षित सैनिक घडवण्यात यावे, असे आवाहन समता सैनिक दलाने सोमवारी दीक्षाभूमीवरून केले.
समता सैनिक दलाच्या ध्वज दिनाच्या ८९ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी दीक्षाभूमी येथील कर्मवारी एड. दादासाहेब कुंभारे सभागृहात राष्ट्रीय प्रतिनिधी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला देशभरातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. भदंत नाग दीपंकर महास्थविर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे हे मुख्य मार्गदर्शक होते. तर राष्ट्रीय जीओसी प्रदीप एस. डोंगरे, राष्ट्रीय स्टाफ ऑफीसर प्राचार्य गजेंद्र गजभिये, राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्राचार्य संजय घोडके, राष्ट्रीय ट्रेनिंग चिफ संघप्रिय नाग, अमर दीपंकर, पृथ्वी मोटघरे, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे चंद्रबोधी पाटील, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांच्यासह आदित्य बोधी (छत्तीसगड), एड. हरिश लोणारे (मध्यप्रदेश), डाॅ. अजय सिग चहल (हरियाणा) हे प्रामुख्याने व्यासपीठावर होते.
याप्रसंगी विविध वक्त्यांनी समता सैनिक दलाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. समाजातील अन्याय अत्याचाराविरोधात तसेच जनजागृतीसाठी समता सैनिक दलाची भूमिका यावरही विचार व्यक्त करण्यात आले. एकूणच आजची परिस्थितीत समता सैनिक दलाला महत्त्वाची भूमिका बजवायची असून यासाठी देशभरात गावागावांमध्ये समता सैनिक दलाची शाखा निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
राजकुमार वंजारी, दुर्गेश थुल, प्रमोद खांडेकर सुभाष खरे,आर. सी. फुल्लुके, आकाश मोटघरे, बी. एम बागडे, नरेंद्र रामटेके मुनेश्वर नागदेवे विलास नागदेवे गोवर्धन वानखेडे, युवराज बडगे, रमेश रंगारे आदींसह देशातील विविध राज्यातील प्रतिनिधी या संमेलनात सहभागी झाले होते.