आठव्या माळ्यावरून उडी घेत बिल्डर दुधानेंची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 12:09 PM2023-06-12T12:09:06+5:302023-06-12T12:10:16+5:30
कुठलीही सुसाइड नोट मिळाली नाही : व्यावसायिकांत खळबळ
नागपूर : उपराजधानीतील बिल्डर व व्यावसायिक अभिजित बापुरावजी दुधाने (४९) यांनी आठव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. त्यांनी जयताळा येथील एका इमारतीच्या आठव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. घटनास्थळावरून कुठलीही सुसाइड नोट न मिळाल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दुधाने यांच्या एका इमारतीचे जयताळा येथे बांधकाम सुरू होते. त्यामुळे ते नियमित तेथे जायचे. रविवारीदेखील ते नेहमीप्रमाणे तेथे गेले. त्या साइटवरून ते दुपारी पाऊण वाजल्याच्या सुमारास जवळच असलेल्या एकात्मता नगर येथील ऑर्बिटल एम्पायरच्या फेज-३ मध्ये गेले व तेथील इमारतीच्या आठव्या मजल्यावर जात तेथून उडी घेतली. रविवार असल्याने तेथील अनेक रहिवासी घरीच होते. उडी घेतल्यावर आवाज झाल्याने लोकांनी धाव घेतली असता दुधाने जखमी अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यांना तातडीने मेडिकल इस्पितळात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी बांधकाम व्यावसायिकांच्या वर्तुळात पसरली.
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथकदेखील घटनास्थळी पोहोचले. दुधाने यांनी आत्महत्या का केली याचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नव्हते. या आत्महत्येमागे व्यावसायिक कारण आहे का याचा शोधदेखील पोलिस घेत आहेत. दरम्यान, अमोल घोगे यांनी दिलेल्या सूचनेवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अभिजित दुधाने हे केवळ बांधकाम क्षेत्रच नव्हे तर जिनिंग प्रेसिंग व टेक्सटाइल उद्योगाशीदेखील निगडित होते.
आर्थिक तणावातून उचलले पाऊल?
बांधकाम व्यावसायिकांना अनेकदा आर्थिक तणावांचा सामना करावा लागतो. त्यातूनच दुधाने यांनी हे पाऊल उचलले का, याचादेखील पोलिस तपास करत आहेत. दुधाने हे मागील काही दिवसांपासून तणावात होते. त्यांचा लवकरच एका प्रॉपर्टीचा सौदादेखील होणार होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.