नागपुरात बिल्डर व साथीदारांनी ६० लाखांची मालमत्ता हडपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:25 PM2018-01-22T23:25:21+5:302018-01-22T23:26:19+5:30
मानसिक अवस्था चांगली नसलेल्या व्यक्तीला पळवून नेऊन त्याची मालमत्ता एका बिल्डर आणि साथीदारांनी परस्पर विकली. त्यातून आलेली ६० लाखांची रोकड स्वत:च्या खात्यात जमा करून ती गिळंकृत केली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही फसवणुकीची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानसिक अवस्था चांगली नसलेल्या व्यक्तीला पळवून नेऊन त्याची मालमत्ता एका बिल्डर आणि साथीदारांनी परस्पर विकली. त्यातून आलेली ६० लाखांची रोकड स्वत:च्या खात्यात जमा करून ती गिळंकृत केली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही फसवणुकीची घटना घडली.
जितेन्द्र चव्हाण, रविकांत बोपचे, दशरथ जोगी, विवेक वाटेकर, मुकेश वाघ अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. चव्हाण आणि बोपचे हे दोघे बिल्डर असून, जोगी चव्हाणचा मामा आहे. तर, वाटेकर आणि वाघ या बनवाबनवीत साक्षीदार म्हणून उभे झाले होते.
अंबाझरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूनम राहुल वासनिक (वय ३२, रा. अंबाझरी लेआऊट) यांचे पती राहुल वासनिक यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याने २००८ पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची मोक्याच्या ठिकाणी मालमत्ता असल्याचे पाहून बिल्डर चव्हाण आणि साथीदारांनी ती हडपण्याचा कट रचला. अचानक २०१२ मध्ये राहुल वासनिक बेपत्ता झाले. त्यांची शोधाशोध केल्यानंतर पूनम यांनी पती हरविल्याची तक्रार अंबाझरी ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोधाशोध केली. जुलै २०१७ मध्ये आरोपी बिल्डर चव्हाण आणि त्याचे साथीदार वासनिक यांची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी पूनम वासनिक यांच्याकडे आले. तुमच्या पतीकडून ही मालमत्ता आम्ही विकत घेतल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे आरोपींनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने राहुल यांना पळवून नेले होते हे उघड झाले. या कालावधीत त्यांना आपल्या ताब्यात ठेवून त्यांच्या नावे असलेल्या घराचे विक्रीपत्र आपल्या नावे करून घेतले. त्याबदल्यात १० लाखांची रोकड तसेच ५० लाखांचे धनादेश वासनिक यांच्या नावाने बँकेत खाते उघडून जमा करण्यात आल्याचे दाखवण्यात येऊन ती रक्कम आरोपींनी स्वत:च्या खात्यात वळती करून घेतली. या बनवाबनवीसाठी आरोपींनी बनावट कागदपत्रेही तयार केली. पूनम यांना ती माहिती कळाल्यानंतर त्यांनी अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. त्याची सविस्तर चौकशी करून पोलीस निरीक्षक प्रसाद सणस यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
बिल्डर गजाआड
आरोपींपैकी बिल्डर चव्हाणला सोमवारी अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, २०१३ मध्ये याच बिल्डरला अंबाझरी ठाण्यात कुख्यात संतोष आंबेकरने पिस्तूल लावून त्याच्याकडून खंडणी उकळली होती. तेव्हा या प्रकरणाने प्रचंड खळबळ उडवून दिली होती.