बिल्डरची ४० कोटींची प्रॉपर्टी जप्त

By admin | Published: June 20, 2017 01:39 AM2017-06-20T01:39:34+5:302017-06-20T01:39:34+5:30

घरकुलाचे स्वप्न दाखवून शेकडो नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करणाऱ्या, नागरिकांची फसवणूक करून ...

Builder's property worth 40 crores was seized | बिल्डरची ४० कोटींची प्रॉपर्टी जप्त

बिल्डरची ४० कोटींची प्रॉपर्टी जप्त

Next

हेमंत झाम यांना दणका   शेकडो नागरिकांची फसवणूक  
घरकुलाचे स्वप्न प्रॉपर्टी सेलची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरकुलाचे स्वप्न दाखवून शेकडो नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करणाऱ्या, नागरिकांची फसवणूक करून त्यांना आर्थिक नुकसानासोबत मानसिक त्रास देणाऱ्या झाम बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सचा संचालक हेमंत सिकंदर झाम यांच्या ताब्यातील ४० कोटींची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली. गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने केलेल्या या दणकेबाज कारवाईमुळे फसवणूक करणाऱ्या बिल्डर लॉबीत खळबळ निर्माण झाली आहे.
मौजा वागदरा (ता. हिंगणा) येथील खसरा नं. ९४,९७, १०८, १०९ मधील ३० एकरात झाम बिल्डर्स अ‍ॅड डेव्हलपर्सचा संचालक हेमंत सिकंदर झाम यांनी कन्हैया सिटी नावाचा गृहप्रकल्प सुरू करण्याची २०१० मध्ये घोषणा केली होती. येथे सदनिका, बंगलो, रो हाऊसेसचे बुकिंग करणारांना १८ ते ३६ महिन्यात ताबा देण्याचे लेखी आश्वासन झाम बिल्डरकडून दिले जात होते. त्यामुळे सुमारे ४१८ ग्राहकांनी त्याच्याकडे सदनिका, बंगलो, रो हाऊसेसची नोंदणी केली. बिल्डरने सांगितल्याप्रमाणे संबंधितांनी त्याला लाखोंची रक्कमही दिली. मात्र, बिल्डरने ठरल्याप्रमाणे ग्राहकांना १८ महिनेच काय, सात वर्षे होऊनही त्यांच्या स्वप्नातील घराचा ताबा दिला नाही.
श्रीकांत रामचंद्र जनबंधू (वय ४३, रा. समतानगर) यांनीही २ मे २०११ रोजी सदनिका बुक करून झामकडे २ लाख ३९ हजार ८०० रुपये जमा केले. ९ नोव्हेंबर २०११ रोजी बिल्डरने तसे मालकी हक्काबाबतचे अ‍ॅग्रीमेंट टू सेल करून देत १८ महिन्यात सदनिकेचा ताबा देणार असे सांगितले.
त्यानंतर जनबंधू जेव्हा जेव्हा आपल्या स्वप्नातील सदनिका बघायला गेले तेथे त्यांना केवळ कुंपण भिंतच दिसून येत होती. त्यामुळे जनबंधू आणि त्यांच्यासारख्याच अनेकांनी झामच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. बिल्डरने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे जनबंधू यांनी १९ आॅक्टोबर २०१५ रोजी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी या फसवणुकीच्या प्रकरणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले. हे प्रकरण गुन्हेशाखेच्या प्रॉपर्टी सेलकडे तपासाला आले. पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर याच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी वजीर शेख यांनी १० जून २०१७ पासून तपास सुरू केला.

आठवडाभरात ९८ जणांचे बयान
आठवडाभराच्या तपासात हेमंत झाम आणि झाम बिल्डरच्या संचालकांनी केवळ जनबंधूच नव्हे तर शेकडो जणांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. रक्कम जमा करणाऱ्या ९८ जणांनी तसे आपल्या बयानात पोलिसांना सांगितले. सोमलवाड्यातील पर्यावरणनगरात झाम बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स प्रा.लि. चे मुख्य कार्यालयातही पोलिसांनी चौकशी केली तेव्हा तेथेही फसगत झालेले अनेक जण येरझारा मारत असल्याचे उघड झाले. ९८ जणांच्या जबानीतून फसवणुकीचा आकडा २ कोटी, ९८ लाख, ८७ हजार, २२८ रुपये असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून रविवारी झाम बिल्डरच्या ताब्यातील ४० कोटींची मालमत्ता जप्त केली.
२५ ग्राहकांना २६ लाख परत
गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलकडून चौकशी सुरू झाल्यामुळे हेमंत झाम याने कारवाई टाळण्यासाठी ४ दिवसात २५ ग्राहकांशी भेटीगाठी घेतल्या आणि त्यांना २६ लाख रुपये डिमांड ड्राफ्टद्वारे परत केले. उर्वरित रक्कमही लगेच परत करतो, असे झामकडून सांगितले जात होते. या पद्धतीने आपल्यावरील कारवाई टाळण्याचा झाम बिल्डरचा डाव होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या मनसुब्यावर पाणी फेरून त्याची मौजा वाघदरा येथील गृहप्रकल्पाची समारे ४० कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली. तसा अहवालही कोर्टाला सादर केला. पोलिसांच्या या कारवाईमुळे झाम बिल्डर आणि त्याच्यासारखेच ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अनेक बिल्डरचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणात पोलीस लवकरच अटकेचीही कारवाई करू शकतात, असे गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले आहे.

लकी ड्रॉ अन् बरेच काही
झाम बिल्डरच्या संचालकांनी नागरिकांना गृहप्रकल्पात रक्कम गुंतविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आकर्षित केले. लकी ड्रॉ च्या माध्यमातून मोफत सदनिका देण्याचेही स्वप्न दाखविले. कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी किंमतीत आम्हीच घरकूल देतो, असाही दावा केला. मात्र, कोणत्याच दाव्याची पूर्तता केली नाही. उलट ज्यांनी झाम बिल्डरच्या संचालकांच्या दाव्यावर विश्वास ठेवला, त्यांना आर्थिक नुकसानासोबतच प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. या प्रकरणात सोनेगाव पोलिसांची भूमिकाही बरीच संशयास्पद आहे. ठाण्यातील काही मंडळी झाम बिल्डरच्या संचालकांशी मधूर संबंध ठेवून त्याच्या आलिशान कारमध्ये फिरण्याचा आनंद उपभोगत असल्याचे जुने चित्र होते. या प्रकाराचाही तपास झाल्यास धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते. दरम्यान, या दणकेबाज कारवाईनंतर गुन्हे शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वजीर शेख पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Builder's property worth 40 crores was seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.